चांदूर रेल्वे : तालुक्यातील सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान ऊर्फ श्रीकृष्ण अवधूतबुवा संस्थानचा गुढीपाडवा व रामनवमी यात्रा महोत्सव यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्याचे संस्थानने दिली आहे.
४०० वर्षांपूर्वी अवधूत पंथाची स्थापना करणारे श्री कृष्णाजी अवधूत महाराजांच्या पावन सावंगा (विठोबा) नगरीत गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भक्तांचा जनसागर लोटत असतो. देशातील लाखो भक्त कृष्णाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन व कापूर जाळून आपल्या भावना व्यक्त करतात. समतेचे प्रतीक असलेले देव व भक्तांच्या ७२ फूट उंच झेड्यांना पदस्पर्श न करता नवीन खोळ चढविण्याचा भव्य, दिव्य, चित्तथरारक धार्मिक विधी लाखो भाविक आपल्या हृदयात जपून ठेवतात. दरवर्षीप्रमाणे संस्थानच्यावतीने गुढीपाडवा यात्रा १३ एप्रिलला व रामनवमी यात्रा २१ एप्रिलला आयोजित होती. मात्र, कोरोनाच्या अनुषंगाने संस्थानची बैठक घेण्यात आली. त्यात महोत्सव आयोजित न करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष वामनराव रामटेके, सचिव गोविंदराव राठोड, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, विश्वस्त हरिदास सोनवाल, विनायक पाटील, पुंजाराम नेमाडे, दिगांबर राठोड, अनिल बेलसरे, फुलसिंह राठोड, विश्वास रामटेके, वैभव मानकर, स्वप्निल चौधरी आदींनी केले आहे.