सुनील देशपांडे - अचलपूरसततची नापिकी, अस्मानी आणि सुल्तानी संकट, भारनियमन यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता निवडक हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा शासनाने केली आहे. त्यानुसार एक हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी साडेसात हजार रुपयांपर्यंतच्या पॅकेजचे वाटप सुरू झाले आहे. या पॅकेजमध्ये बियाणे, सूक्ष्म मुलद्रव्ये, औषधे व फवारणी पंपांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा अचलपूर तालुका आहे. जवळपास ७० टक्केपेक्षा अधिक शेतकरी कोरडवाहू शेती करतात. त्यांचे शेतातील पीकपाणी निसर्गाच्या भरवशावर आहे. ओलिताची शेती करणाऱ्यांना भारनियमनाचा फटका बसत असल्याने त्यांनाही पीक घेणे कठीण होऊन बसले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे दुबार, तिबार पेरणी करुनही बियाणे उगवले नाही. नापिकी, कमी उत्पादन आणि बेभरवशाची शेती, त्याचबरोबर बँका, पतसंस्थांचे कर्ज, ऋण काढून केलेली शेती त्यातच अवकाळी पाऊ स आणि अतिवृष्टीचा बसलेला फटका आदींमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील वाढत चाललेला कर्जाचा डोंगर आदी संकटामुळे शेतकरी होत्याचे नव्हते झाले आहे. शासनाने कृषी विभागामार्फत हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेजची घोषणा निवडकांसाठी जाहीर केली असल्याने बाकी हरभरा उत्पादकांत असंतोष निर्माण झाला आहे. सर्व्हे करुन सरसकट पॅकेजचा लाभ देण्यात यावा, अशी हरभरा उत्पादकांची मागणी आहे. अचलपूर तालुक्याच्या ज्या भागात हरभऱ्याचा पेरा अधिक असतो अशा निवडक गावांची या प्रकल्पांसाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळे चार प्रकल्प राबविण्यात येत आहे. एकंदरीत चार प्रकल्प मिळून ७५० शेतकऱ्यांना संपूर्ण तर २५० शेतकऱ्यांना बियाणेरहित प्रकल्पाचा लाभ देण्यात येणार आहे. अचलपूर तालुक्यातील १०० हेक्टरवर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रति शेतकरी ४० आर. क्षेत्रासाठी हा लाभ दिला जाईल. यात या शेतकऱ्याला ४० आर क्षेत्रासाठी लागणारे बियाणे, सूक्ष्म मुलद्रव्ये, पाठीवरील फवारणी पंप कीटकनाशके व मशागतीच्या खर्चासाठी रोख रक्कम दिली जाणार आहे. सर्वांचे मिळून साडेसात हजारांचे हे पॅकेज असेल, असे कृषी अधिकारी पी.बी. जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
हरभरा उत्पादकांना हवा पॅकेजचा सरसकट लाभ
By admin | Updated: December 3, 2014 22:42 IST