अमरावती : सौर ऊर्जेचा वापर वाढवा यासाठी राज्यात सौर उष्णजल संयंत्र आस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागाव्दारे (महाऊर्जा) आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शासकीय संस्था असलेल्या आस्थापनांना ५० टक्के अनुदान तत्वावर सौर उष्णजल संयंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.
शासकीय वसतिगृहे, आश्रमशाळा, विश्रामगृहे, दवाखाने, कारागृहे, प्रशिक्षण संस्था आदींकडून सौर उष्णजल संयंत्र मागणीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहे. राज्य शासनाने महाऊर्जास यंदा आस्थापित करण्यात आलेल्या सौर उष्णजल संयंत्रासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले आहे. यात महाराष्ट्रातील शासकीय संस्था जसे शासकीय मुलांचे, मुलींचे वसतिगृह, शासकीय आश्रमशाळा, शासकीय निवासी शाळा, विश्रामगृहे, रुग्णालये, दवाखाने, कारागृहे, प्रशिक्षण संस्था, धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणीकृत संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, निबंधक सहकार यांच्याकडील नोंदणीकृत इमारत, अपार्टमेट, शैक्षणिक संस्था आदी आस्थापना सौर उष्णजल संयंत्र योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील.
बॉक्स
असे आहे अनुदान
एप्रिल ते डिसेंबर २०२० हा सौर उष्णजल आस्थापित झालेला कालावधी आहे. किमान ५०० लिटर प्रतिदिन व त्यापुढील सौर उष्णजल संयत्रे अनुदानासाठी पात्र असेल. पात्र लाभार्थ्यांना रुपये १,५०० रुपये प्रति चौ.मी. अनुदान आणि जिल्हा परिषदमार्फत दारिद्र रेषेखालील व अल्प उपन्न गटातील लाभार्थी असलेल्या ठिकाणी १२५ लिटर प्रतिदिन क्षमतेची सौर उष्णजल संयंत्रेस ५० टक्केपर्यंत अनुदान देय राहणार आहे.