महापालिका आयुक्तांचा निर्णय : अतिरिक्त, विनापरवानगी बांधकाम शोधून काढणारअमरावती : शहरातील हॉटेल, प्रतिष्ठाने, शाळा व महाविद्यालयांच्या बांधकामाची मोजणी आटोपल्यानंतर महापालिका आयुक्तांचा मोर्चा आता आजी-माजी आमदार, खासदारांच्या घरमोजणीकडे वळणार आहे. लोकप्रतिनिधींच्या घरांची मोजणी करताना बांधकाम परवानगी आहे किंवा नाही यासह अतिरिक्त बांधकामही शोधून काढले जाईल.आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी ऐतिहासीक अंबादेवी, एकवीरादेवी मंदिरांच्या बांधकामाची तपासणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, कर्तव्यात कोणताही कसूर न करता आयुक्त गुडेवार यांनी मालमत्ता मोजून काढण्याची मोहीम निरंतरपणे सुरु ठेवण्याच्या सूचना पाचही झोनच्या सहायक आयुक्तांना दिल्या आहेत. महापालिका परिसरातील आजी-माजी आमदार, खासदारांच्या घरांची मोजणी करताना कोणताही राजकीय दबाव खपवून न घेता मोजणीनंतर वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी पाचही झोनच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत. परवानगी शिवाय केलेले अतिरिक्त बांधकाम आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मात्र, आजी-माजी आमदार, खासदारांची घरे मोजताना संबंधित झोनमधील अधिकाऱ्यांना पारदर्शकपणा ठेवावा लागणार आहे. आयुक्तांनी त्रयस्थ एजन्सीमार्फत या घरांची मोजणी करून घेतल्यास व त्यानंतरच्या अहवालात तफावत आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. महापालिका आयुक्तांच्या या निर्णयानंतर शहरातील संभाव्य राजकीय उलथापालथींकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. १ लाख ८५ हजार मालमत्ता मोजणारशहरातील प्रत्येक घराची मोजणी होईल. कोणतीही मालमत्ता यातून सुटणार नाही. महापालिकेच्या बडनेरा, भाजीबाजार, हमालपुरा, राजकमल चौक व रामपुरी कॅम्प अशा पाच झोनमध्ये एकूण १ लाख ८५ हजार मालमत्तांची नोंद आहे. मालमत्तांच्या नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. मात्र,आमदार, खासदारांची घरे मोजताना विशेष काळजी घेतली जाईल. सोलापूर येथे कार्यरत असताना तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे घर देखील मोजले होते, असे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले.
आजी-माजी आमदार-खासदारांच्या घरांचीही मोजणी!
By admin | Updated: August 9, 2015 23:54 IST