अनुदान देणार : पालकमंत्री पोटे यांची माहितीअमरावती : विदर्भाचे ‘हिल स्टेशन’ म्हणून नावारुपास आलेल्या चिखलदऱ्यात स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी राज्य शासन पुढाकार घेणार असून ते रोजगाराचे साधन करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे रविवारी दिली.येथील शासकीय विश्रामभवनात पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी ना. पोटेंनी दुग्ध, मस्त्य व पशुसंवर्धन व्यवसायातून रोजगार निर्मितीचे स्वप्न असल्याचे सांगितले. शेतकरी सधन कसा करता येईल, याचे सूक्ष्म नियोजन केले जात आहे व त्या अनुषंगाने स्ट्रॉबेरी शेतीलाही प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले. यावर्षी दोन युवकांनी पुढाकार घेत चिखलदऱ्यात स्ट्राबेरीची शेती केली. ४ गुंठ्यात दोन लाखांचे उत्पन्नही घेतले. मात्र हा प्रयोग केवळ दोन भूखंडावर करण्यात आला असून चिखलदऱ्यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन महाबळेश्वरपेक्षा चांगल्या दर्जाचे होऊ शकते, हे सिद्ध झाले आहे. चिखलदऱ्यात स्ट्रॉबेरी पिकाला प्राधान्य देताना शासन अनुदान देण्याचा प्रस्ताव आहे. ही शेती रोजगाराचे प्रमुख दालन होऊ शकेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी चिखलदऱ्यात स्ट्रॉबेरी पिकाच्या पाहणीअंती निष्कर्ष लावला. यंदा चिखलदऱ्यात उत्पादित स्ट्राबेरीची चव ही महाबळेश्वरच्या तुलनेत अधिक चवदार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. रोजगाराचे साधन म्हणून स्ट्रॉबेरीची शेती केल्यास ती फायदेशीर ठरेल. शासन स्तरावर स्ट्रॉबेरी शेतीसाठी कृषी विभागाकडून आवश्यक ते अनुदान कसे देता येईल, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घतली जाईल, असे पालकमंत्री म्हणाले. स्ट्रॉबेरी उत्पादन, विक्रीचे चिखलदरा स्वतंत्र ब्रँड कसे तयार येईल, त्या दिशेने वाटचाल केली जाणार आहे. ही शेती अधिक प्रगत करण्यासाठी शासन स्तरावर जमिनीचे पट्टे देण्याबाबतही विचार केला जाईल. मेळघाट हा आदिवासीबहुल भाग असून स्ट्रॉबेरी शेतीने या भागाला नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न राहील, असे ना. पोटे म्हणाले.
चिखलदऱ्यात स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी शासनाचा पुढाकार
By admin | Updated: February 8, 2015 23:27 IST