सोयाबीन क्लस्टर सुरु होणार : जिल्हा उद्योजक पुरस्कारांचे वितरणअमरावती : उद्योजकांनी पारंपारिक उद्योगांकडे न वळता काळाच्या गरजेनुसार नवीन उद्योगांकडे वळावे व उद्योगांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे यांनी दिली. सातुर्णा येथील चार्टड असोसिएशनच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य औद्योगिक समुह विकास योजनेंतर्गत क्षमता वृद्धी कार्यक्रम व जिल्हा उद्योजक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते शनिवारी बोलत होते. यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी किरण गित्ते, एम.टी.वाकोडे, हिमांगी भुरे, ब्रिजेश फाफट, विनोद तांबी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उदय पुरी उपस्थित होते. औद्योगिक समूह विकास योजना अंतर्गत जिल्ह्यात राज्यातील ३० क्लस्टर पैकी तीन क्लस्टर त्यामध्ये रेडीमेड गारमेंट क्लस्टर अमरावती, टिकवूड फर्निचर क्लस्टर परतवाडा, हनी प्रोसेसिंग क्लस्टर शिंगणापूर या क्लस्टरच्या क्षमता वृद्धी कार्यक्रमाकरीता मान्यता मिळालेली आहे. यावरुन जिल्ह्यात उद्योगासाठी पुरक असे वातावरण असल्याचे मत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी व्यक्त केले. तसेच या जिल्ह्यात भविष्यात सोयाबिनचे क्लस्टर देखील सुरु करता येऊ शकते, असा ही सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. या प्रसंगी उद्योगाची माहिती देणाऱ्या पत्रकांचे विमोचन पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी किरण गीत्ते, महाव्यवस्थापक उदय पुरी यांच्या हस्ते करण्यात आले. महाव्यवस्थापक उदय पुरी यांच्या कामाचे कौतूक यावेळी पालकमंत्र्यांनी केले. दालमील, जिनिंग प्रेसींग या सोबतच नवीन उद्योगांकडे जिल्ह्यातील तरुण उद्योजकांनी वळावे. तरुणांना उद्योगाकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री प्रविण पोटे म्हणाले. पुढे बोलतांना ते म्हणाले जिल्ह्यात भविष्यात रेशीम उद्योग क्लस्टर विकसित करण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात हेमंत सारंडे यांना जिल्हा उद्योजक प्रथम पुरस्कार रोख रक्कम व मानचिन्ह देऊन तर द्वितीय पुरस्कार विभागून रोख रक्कम व मानचिन्ह शरद भारसाकळे व दिवाकर देव व शुभेश कामाविरादार यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषीक देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उद्योजक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्योग विकासासाठी शासन कटिबद्ध
By admin | Updated: August 9, 2015 00:38 IST