लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शहरातील मुख्य मार्गावरील सराफा प्रतिष्ठानात शुक्रवारी पहाटे ३:४५ च्या सुमारास चोरट्यांनी सराफा दुकान फोडून सुमारे ३६० ग्रॅम सोने, ३.५० किलो चांदी व ५.५० लाख रुपये रोख रक्कम लांबविली. दरम्यान सराफा व्यावसायिकाने पावत्यांची जुळवाजुळव सुरू केल्याने तो आकडा वाढण्याची अधिक शक्यता आहे. वृत्त लिहिस्तोवर रात्री १० पर्यंत यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
विशेष म्हणजे, चोरांनी त्या सराफा दुकानातील डीव्हीआरदेखील पळविला. अवघ्या १२ ते १५ मिनिटात कारमधून आलेले चोरटे चोरी करून पळून गेले. विशेष म्हणजे, उजाडेपर्यंत प्रतिष्ठानाला लागूनच घर असलेल्या संचालकांना लाखोंचा ऐवज गमावल्याचे माहितीच झाले नाही. सुवर्णकार रमेश लोणकर यांनी शुक्रवारी सकाळी दर्यापूर पोलिसांत फिर्याद नोंदविली. त्यानुसार, चोरटे एका कारमध्ये शुक्रवारी पहाटे ३:४५ वाजता त्यांच्या प्रतिष्ठानापुढे आले. कारमधून उतरून तोंडाला कापड घट्ट बांधून असलेल्या व्यक्तीने सीसीटीव्हीकडे रोख केला आणि टॉमीच्या साहाय्याने ते वाकविले.
हा ऐवज झाला लंपासलोणकर यांच्यानुसार, अज्ञात चोराने त्यांच्या दुकानातील काउंटरमधील १३ किलो चांदी, ७६० ग्रॅम सोन्याचे दागिने लांबविले. याशिवाय ड्रॉवरमध्ये दिवसभराच्या व्यवहाराचे सुमारे पाच लाख रुपये रोख होते. या सर्वांवर चोरट्यांनी हात साफ केला, अशी फिर्याद त्यांनी नोंदविली. मात्र पोलिसांनी ती नोंदविली नाही.
घरात चोरीचा सुगावाच लागला नाहीरमेश लोणकर यांचे घर आणि प्रतिष्ठान एकाच आवारात आहे. प्रतिष्ठानाच्या मागील दारातून घरात जाता येते. त्यामुळे दागिने व रोकड सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत हलगर्जी केली आणि नेमकी ही बाब चोरट्यांच्या पथ्यावर पडली. विशेष म्हणजे, सकाळी झोपेतून जागे होईपर्यंत त्यांना चोरी झाल्याचे माहितीदेखील झाले नाही.
पोलिसांकडून पंचनामारमेश लोणकर यांच्या फिर्यादीवरून ठाणेदार शिवम बिसापुरे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळ गाठले. न्यायवैद्यक शाखेचे पथक आणि ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला. चोरट्यांची संख्या नेमकी किती, हे पुढे आलेले नाही.