नवनीत राणा यांची शासनाकडे मागणी, अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा
अमरावती : दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या पावसाने अनेक गावांमध्ये ढगफुटी, अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गावांची खासदार नवनीत राणा यांनी पाहणी करून नुकसाग्रस्तांच्या व्यथा जाणून घेताना त्यांचे अश्रू पुसले. अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार मदत द्या, अशी आर्जव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी केली.
पुसदा, देवरा, देवरी, रोहनखेडा, नांदुरा, लष्करपूर, अंतोरा, ब्राह्मणवाडा भगत आदी गावांमध्ये पुराचे पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले. शेती पाण्याखाली, घराघरात पाणी गेले. गुरेढोरे वाहून गेली. हे विदारक दृश्य पाहून खासदार राणा हेलावल्या.
टेंबा बॅरेज प्रकल्पात समाविष्ट १३ गावे २००७ पासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. ६० टक्के खरेदी बाकी आहे. शासनाच्या लेखी ही गावे बुडीत क्षेत्रात असल्याने या गावातील नागरिकांना प्रत्येक पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. गावकऱ्यांच्या समक्ष खासदार राणांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना फोन लावून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले व तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
-------------------
जिल्ह्यात पंतप्रधान ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत रस्ते व पुलांची कामे सदोष असून, त्यात तांत्रिक चुका असल्याचे गावकऱ्यांनी सांगताच खासदार नवनीत राणा यांनी तात्काळ या विभागाचे कार्यकारी अभियंता खान यांना भ्रमणध्वनीवरून सर्व कामांचे स्थळनिरीक्षण करून चुका दुरुस्त करण्याचे व अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मयूरी कावरे, नायब तहसीलदार बढिये, सरपंच उज्ज्वला दळवी, माजी सरपंच संदीप तायडे, विस्तार अधिकारी जितेंद्र देशमुख, कृषिसहायक वृषाली गावंडे, मंडळ अधिकारी नीता तवाने, मनोज देशमुख, सरपंच ममता बडे, तलाठी स्वाती चिचे, तलाठी घुंगे, युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, अभिजित देशमुख, अवी काळे, अंकुश ठाकरे, गौतम हिरे, अश्विन उके, ललित पिवाल, पवन हिंगणे, मंगेश कोकाटे, सचिन सोनवणे, अरुण कीटुकले, घनश्याम किटुकले, प्रफुल्ल राणे, प्रमोद राणे, अजय बोबडे आदी उपस्थित होते.