अमरावती : भरधाव दुचाकीच्या धडकेत अडीच वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. २० जुलै रोजी दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास लक्ष्मीनगर स्थित एका दवाखान्याजवळ हा अपघात घडला.
याप्रकरणी मृताचे वडील अजय भगत (२८, रा. रमाबाई आंबेडकर) यांच्या तक्रारीवरून आरोपी दुचाकीचालक ऋत्विक कमलाकर काळे (२१, रा. लक्ष्मीनगर) याच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तक्रारीनुसार, अजय भगत हे पत्नीला घेऊन दवाखान्यात गेले असता, त्यांची अडीच वर्षांची मुलगी ही दवाखान्याबाहेर रोडच्या कडेला उभी होती. त्यावेळी लहरीबाबा मंदिराकडून आलेल्या एका दुचाकीस्वाराने तिला धडक दिली व तो पळून गेला. तिला तातडीने विलासनगर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. औषधोपचार घेऊन घरी परतल्यानंतर अर्ध्या तासात त्या बालिकेने छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यामुळे तिला पीडीएमसीमध्ये हलविण्यात आले. मात्र, तेथे मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर मृूताच्या वडिलांना सोबत घेऊन गाडगेनगर पोलिसांनी दुचाकीचालकाचा शोध घेतला. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.