प्रहार शहर अध्यक्ष ची तक्रार;
दोषीवर कारवाईची मागणी;
जिल्हाधिकारी ना निवेदन
चांदूर बाजार : स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर हॉस्पिटलमधील एक कंत्राटी लॅब तंत्रज्ञाने अँटिजेन चाचणीच्या माध्यमातून रुग्णांना लुबाडण्याचा गोरखधंदा केल्याचा आरोप प्रहारचे शहराध्यक्ष नरेंद्र वानखडे यांनी केला आहे. संबंधित प्रयोगशाळा तंत्रज्ञाची चौकशी करून कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.
प्रहार शहराध्यक्ष नरेंद्र वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीनुसार चांदूरबाजार येथे कविड रुग्णालय सुरू होण्याआधी या रुग्णालयात विलगीकरणाची सोय होती. शहरात इतर ठिकाणी खासगी कोविड रुग्णालय सुरू होते. या संधीचा फायदा घेऊन ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्ण चाचणी विभागात कार्यरत कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ विशाल बोंबे याने अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अँटिजेन चाचणीचा गोरखधंदा सुरू केला. यात पॉझिटिव्ह निघणाऱ्या रुग्णांना खासगी कोविड रुग्णालयात पाठविण्यात येत होते. खासगी रुग्णालयातून नंतर त्या रुग्णांना विशाल बोंबे यांच्या खासगी सानिका लॅबमध्ये पाठवून त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
शासनाने निर्बंध शिथिल केल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयाने खरेदी-विक्री व्यवहाराकरिता अँटिजेन टेस्ट अनिवार्य केली. त्यातही या कंत्राटी तंत्रज्ञाने निगेटिव्ह रिपोर्टकरिता आर्थिक लूट सुरू केली. विशाल बोंबेसह नव्याने रुजू झालेल्या टेक्निसियनची रुग्णांसोबत उध्दट वागणूक असते, असेही तक्रारीत नमूद केले आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेऊन समितीमार्फत चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी नरेंद्र वानखडे यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.
विशाल बोंबे यांची नियुक्ती कंत्राटी पध्दतीने एड्स तपासणीकरिता असताना त्याने अँटिजेन टेस्टचे कार्य सुरू केले. विशेष म्हणजे एकाही कायम स्वरूपाचा कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली नाही. इतकेच नव्हे तर सदर व्यक्तीकडे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनी स्वाक्षरी, शिक्का मारलेले कोरे प्रमाणपत्र देऊन त्याचा पैसे उकळण्याचा गोरखधंदा सोयीस्कर केल्याचा आरोपही तक्रारीत केला आहे.