विद्यार्थी, शिक्षकांची लगबग : जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा अमरावती : नव्या शालेय सत्राला शुक्रवारपासून सुरूवात झाली. नवागत विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस सुसह्य वाटावा व त्यांचा उत्साह वाढावा याकरिता गुलाबपुष्प व मिष्टान्न देऊन त्यांचे स्वागत करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश होते. त्या अनुषंगाने जिल्हाभरातील शाळांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ‘प्रवेशोत्सवा’चा उत्साह सगळीकडे दिसून आला. दोन्ही शालेय सत्रांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीने शहरातील रस्ते गजबजून गेले होते. प्रत्येक शाळांतील शिक्षक व शाळा पदाधिकाऱ्यांनी दोन्ही सत्रातील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्यात. शहरातील मणिबाई गुजराथी हायस्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, महर्षी पब्लिक स्कूल, गोल्डन किड्स स्कूल, तोमोय स्कूल, विश्वभारती स्कूल, अभ्यासा इंग्लिश स्कूल, होलीक्रॉस कॉन्व्हेंट, ज्ञानमाता स्कूल, मदर्स पेट, गर्ल्स हायस्कूल, आदर्श प्राथमिक शाळा, रामकृष्ण क्रीडा विद्यालय, साक्षरा विद्यानिकेतन, स्कूल आॅफ स्कॉलर्स, राजेश्वर स्कूल, बडनेरा, नूतन कन्या स्कूल, न्यू हायस्कूल, मुधोळकर पेठ शाळा, तखतमल इंग्लिश स्कूल, दीपा कॉन्व्हेंट, पी.आर. पोटे इंटरनॅशनल स्कूल आदी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शहरातील सर्वच शाळांची सफाई करून सजावट करण्यात आली होती. वडाळीतील महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सहभागाने ग्रंथदिंडी काढण्यात आली. केक कापून ‘प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकसंचही प्रदान करण्यात आले. ‘लोकमत’ने महापालिका तसेच जि.प. शाळांच्या दुरवस्थेबद्दल वृत्त प्रकाशित केल्यानंतर शुक्रवारी या शाळांमध्ये साफसफाई केल्याचे चित्र होते. या शाळांमध्येही प्रवेशोत्सवाची लगबग शुक्रवारी दिसून आली. (प्रतिनिधी)
गजबजल्या शाळा, गुलाबपुष्पाने स्वागत
By admin | Updated: June 27, 2015 00:10 IST