अमरावती : गिट्टीने भरलेला भरधाव मिनीट्रक शनिवारी दुपारी २.४५ वाजताच्या दरम्यान आयएमए हॉलसमोर उलटल्याने खळबळ उडाली. या अपघातामुळे कॅम्प मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. ट्रक एम.एच. २८-बी-६२१० हा मासोद येथून गिट्टी भरून अमरावतीच्या माताखिडकी परिसराकडे जात होता. दरम्यान दुपारी आयएमए हॉलसमोर ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे स्टेअरिंंगवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर चढला. त्यानंतर तो उलटला. ट्रकमधील गिट्टी रस्त्यावर पसरल्याने कॅम्प मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांनी ट्रकचालक अमोल विश्वकांत धांडे (२५, रा.वडाळी) व त्याचा सहकारी प्रदीप मोहनकर यांना ट्रकमधून बाहेर काढले. या अपघातात ट्रकचालक व मजूर किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती कळताच शहर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. पुढील कारवाई पोलीस करीत आहेत. या अपघातात मोठी हानी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते.
आयएमए हॉलसमोर मिनीट्रक उलटला
By admin | Updated: June 7, 2015 00:23 IST