अमरावती : शिवभोजन थाळी उपक्रमात अमरावती जिल्ह्यात गरजू व गरीब लाभार्थ्यांना १५ एप्रिल ते २३ ऑगस्ट या काळात ४ लाख ६१ हजार ४४० शिवभोजन थाळीचे नि:शुल्क वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शिवभोजन केंद्रांवरून १४ सप्टेंबरपर्यंत नि:शुल्क शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी दिली.
गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्यासाठी जानेवारी २०२० मध्ये शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्यात सध्या २६ शिवभोजन केंद्रे सुरू आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत गरीब व गरजू रुग्णांना भोजन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवभोजन थाळी एप्रिलपासून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली. त्याचप्रमाणे, थाळीच्या इष्टांकात प्रतिदिन दीडपट वाढ करण्यात आली. त्यानुसार प्रतिदिन २ हजार ९८० थाळींचे वितरण होत आहे, असे टाकसाळे यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यात दोन लाख एवढा इष्टांक असून, राज्यात एप्रिल ते ऑगस्टदरम्यान २ कोटींहून अधिक नि:शुल्क थाळ्यांचे वितरण झाले आहे.
कोट
गोरगरीब व्यक्तींना सवलतीच्या दरात जेवण देण्यासाठी शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली. कोविडकाळात लॉकडाऊनमुळे गरजू बांधवांचे जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून थाळी विनामूल्य करण्याचा निर्णय महाविकास आघाडी शासनाने घेतला. ही योजना गरीब, वंचित व गरजू बांधवांसाठी आधार ठरली आहे.
- यशोमती ठाकूर,
पालकमंत्री, अमरावती