चालक-वाहक संयुक्त कृती समितीचे आंदोलन अमरावती/ बडनेरा : भंगार झालेल्या बसगाड्या, एसटीत साहित्य नसणे, प्रवाशांचा वाढता रोष आणि वाहक, चालकांना होणाऱ्या मारहाणीच्या निषेधार्थ एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्यावतीने बुधवारी प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारला. पहाटे ५ वाजता सुरु झालेले हे आंदोलन सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होते. त्यामुळे एसटीच्या चाकांना तब्बल पाच तास ब्रेक मिळाला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात मध्यस्थी करुन तोडगा काढला. त्यानंतर एसटी रस्त्यावर धावू लागताच प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. अमरावती व बडनेरा आगारातील प्रवाशांना या आंदोलनाचा मोठा फटका बसला, हे विशेष.या सहा प्रमुख मागण्यांवर झाली चर्चा, नंतर निघाला तोडगासहा मागण्यांवर बुधवारी तोडगा काढण्यात आला. यात मोटारवाहन कायद्यानुसार वाहन रोजनाम्यातील राज्य परिवहन महामंडळाने ठरविलेल्या २२ उल्लेखित हत्यारे व साधन सामग्री, वाहक व चालकांचे रोटेशन पद्धतीनुसार कर्तव्य बंद करणे, अपराध प्रकरणाच्या अनुषंगाने होणाऱ्या बदनामी रद्द करणे, अनधिकृत रोटेशन कार्यपद्धतीची अंमलबजावणीअभावी वाहतूक पर्यवेक्षकांना दिलेले ओळखपत्र दत्फरी जमा करणे, शिस्त व आदेश पद्धतीचा अतिरेक थांबविणे तसेच प्रशासनाच्या दिरंगाईमुळे खोळंबलेल्या बस वाहतूक प्रकरणी कर्मचारी, पर्यवेक्षकांवर कारवाई न करणे या प्रमुख मुद्याचा समावेश होता.शालेय सहल घेऊन जाणारी एसटीही नादुरुस्तअमरावतीच्या एका शाळेतील शेगावला सहल घेऊन जाणारी बस क्र. ४० एन ८७२७ ही प्रासंगिक करारानुसार ठरविण्यात आली होती. मात्र, ही बस काहीवेळ रस्त्यावर धावताच पट्टा तुटल्याने बंद पडली. परिणामी सहलीच्या विद्यार्थ्यांना बडनेरा आगारातून वेगळ्या एसटीची व्यवस्था करण्यात आली. केवळ १० किलामिटरपर्यंतही बसेस व्यवस्थित धावू शकत नाही, अशी विदारक अवस्था परिवहन महामंडळाची आहे. सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थी व शिक्षकांना बुधवारी मन:स्ताप सहन करावा लागला, हे विशेष.
एसटीच्या चाकांना पाच तास ब्रेक
By admin | Updated: December 10, 2014 22:48 IST