अमरावती : थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांच्या विशेषाधिकाराविषयीचा संभ्रम बुधवारी नगरविकास विभागाने दूर केला. त्यानुसार जुन्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपताच दुसऱ्याच दिवशी नवीन नगराध्यक्ष पदभार सांभाळतील व नगर पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा बोलावतील. ही सभा बोलविण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांऐवजी आता नगराध्यक्षांना देण्यात आला आहे. राज्यपालांच्या आदेशाने नगरविकासचे सहसचिव जयसिंराव पाटील यांनी बुधवारी हा अध्यादेश जारी केला आहे. आॅक्टोबरच्या अखेरीस जिल्ह्यातील मोर्शी, शेंदूरजनाघाट, वरूड, चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगांव सुर्जी, दर्यापूर, धामणगांव व चांदूररेल्वे नगर पालिकांची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. नगराध्यक्ष व सदस्यांची नावे ५ डिसेंबरला राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या दिनांकाच्या २५ दिवसांच्या म्हणजेच ३० डिसेंबरच्या आत उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांची निवड बैठकीद्वारे केली जाणार आहे. ही पहिली सर्वसाधारण सभा बोलविण्याचा अधिकार आता नगराध्यक्षांना देण्यात आला आहे. त्यामुळे या नऊ नगर पालिकांमध्ये आजच्या तारखेत बैठक बोलविण्याचे मुख्याधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. यासर्वसाधारण बैठकीमध्ये उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य निवडले जाणार आहेत बैठकीचे पीठासीन अध्यक्ष नगराध्यक्ष राहणार आहे. गट, पक्ष किंवा आघाडीच्या गटनेत्यांनी अनुज्ञेय संख्येपेक्षा अधिक व्यक्तिंचे शिफारसपत्र नगराध्यक्षाकडे दिल्यास अनुज्ञेय संख्येएवढीच अनुक्रमिक शिफारसपत्रे नगराध्यक्ष स्वीकारणार आहेत.एकाच पृष्ठावर अनुज्ञेय संख्येपेक्षा अधिक नावे नगराध्यक्षाकडे दिल्यास अशा पत्रावरील अनुज्ञेय संख्या असलेली अनुक्रमिक नावेच नगराध्यक्ष स्वीकृत सदस्यपदासाठी जाहीर करणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांऐवजी नगराध्यक्ष बोलविणार पहिली सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2016 00:09 IST