लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : वन आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या वनअधिकाऱ्यांची परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आली आहे. तेव्हाचा हरिसाल येथे स्थापित वनशहीद स्तंभ आजही मेळघाटात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनीही अत्युच्च कार्याची दखल घेतली असून, तो पहिला वनशहीद स्तंभ ठरला आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात मेळघाटच्या जंगलाचे वनव्यवस्थापन, वनप्रशासन ब्रिटिश राजवटीतील अधिकाऱ्यांकडे होते. वन आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनार्थ राबणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर वनांची भिस्त होती. तत्कालीन मेळघाट फॉरेस्ट डिव्हिजन अंतर्गत कार्यरत फॉरेस्ट रेंजर नाझीर मोहम्मद हे १६ फेब्रुवारी १९३५ रोजी मेळघाटच्या जंगलाला लागलेल्या आगीत भाजले गेले होते. त्यांची अमरावती येथील रुग्णालयात २३ फेब्रुवारी १९३५ रोजी उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांनी तब्बल २१ वर्षे मेळघाट फॉरेस्ट डिव्हिजनमध्ये आपली सेवा दिली होती. तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक मार्बल स्टोन हरिसाल परिसरात लावला. केंद्र शासनाच्या ७ मे २०१३ च्या अधिसूचनेनुसार ११ सप्टेंबर हा राष्ट्रीय वनहुतात्मा दिन म्हणून घोषित करण्यात आला आणि नाझीर मोहम्मद यांच्या स्मृतीस उजाळा मिळाला.राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाच्या औचित्यावर मेळघाटातील दुसरा वनशहीद स्तंभ स्वातंत्र्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी चिखलदरा येथील वनउद्यानात (फॉरेस्ट गार्डन) उभारण्यात आला आहे. मेळघाट प्रादेशिक वनविभागाकडे स्तंभाच्या देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या वनशहीद स्तंभावर अग्रक्रमाने नाझीर मोहम्मद यांचे नाव अंकित असून, ते मेळघाटातील पहिले वनशहीद ठरले आहेत. त्यांच्यासह अकोट-वडगाव क्षेत्रात १५ मे २००१ ला वनशहीद झालेले वनक्षेत्रपाल त्र्यंबकराव भारती यांचे नाव आहे. स्वातंत्र्यानंतर मेळघाटात वनशहीद ठरलेले हे पहिले वनक्षेत्रपाल. यानंतर ४ ऑगस्ट २०१० ला जारिदा क्षेत्रात अस्वलीच्या हल्ल्यात ठार झालेले वनरक्षक अभिष वाकोडे आणि १४ नोव्हेंबर २०१३ ला शहीद झालेले वनमजूर सुधाकरराव ढेमरे यांची नावे या नव्या शहीद स्तंभावर आहेत.
मेळघाटात पहिला वनशहीद स्तंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST
स्वातंत्र्यपूर्व काळात मेळघाटच्या जंगलाचे वनव्यवस्थापन, वनप्रशासन ब्रिटिश राजवटीतील अधिकाऱ्यांकडे होते. वन आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनार्थ राबणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर वनांची भिस्त होती. तत्कालीन मेळघाट फॉरेस्ट डिव्हिजन अंतर्गत कार्यरत फॉरेस्ट रेंजर नाझीर मोहम्मद हे १६ फेब्रुवारी १९३५ रोजी मेळघाटच्या जंगलाला लागलेल्या आगीत भाजले गेले होते.
मेळघाटात पहिला वनशहीद स्तंभ
ठळक मुद्देइंग्रजांनी घेतली दखल : स्वातंत्र्यपूर्व काळातील नाझीर मोहम्मद यांचे नाव अग्रक्रमावर