बेलोरा विमानतळानजीक घटना : २० अग्निशमन बंब दाखल, बांबुडेपो खाकबडनेरा : अकोला महामार्गावरील बेलोरा गावानजीकच्या एका बांबू डेपोला लागलेल्या आगीत मोठी हानी झाली. बांबू डेपोला लागूनच दोन पेट्रोलपंप व सीएनजी पंप आहेत. सुदैवाने ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले नाही. ही घटना गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. बडनेरापासून तीन किलोमीटर अंतरावरील महामार्गावर असलेल्या दशमेश ट्रेडींग कंपनीत बांबूविक्रीचा डेपो आहे. त्याच ठिकाणी वीज वितरण कंपनीचे रोहित्र बसविण्यात आले आहे. यामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आगीच्या ठिणग्या जमिनीवर पडल्यात. त्यामुळे तेथील वाळलेल्या गवताने पेट घेतला व आग बांबूंपर्यंत पोहोचली. शेजारीच असलेल्या पेट्रोलपंपांच्या डिझेलच्या टाकीपर्यंत ही आग पोहोचली. अग्निशमन दलाने पेट्रोलपंपाच्या बाजूने भडकलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाचे दुसरे वाहन येण्यास जरा विलंब झाल्याने आग अधिकच भडकली. आग विझविण्याकरिता चांदूरबाजार, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. शॉर्टसर्किट झाल्यानेच आग लागल्याचे डेपोमालकाचे म्हणणे आहे. घटनास्थळी तहसीलदार वाहुरवाघ, ठाणेदार विशाल खलसे पोहोचले होते.
भीषण आग, पेट्रोलपंप बचावले
By admin | Updated: May 6, 2016 00:05 IST