महापालिकेची कारवाई : अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणलेअमरावती : शासकीय नियम धाब्यावर बसवून चक्क नाल्याच्या जागेवर उभारलेल्या पाच मजली टोलेजंग इमारतीवर मंगळवारी अखेर हातोडा पडला. अतिक्रमण आणि अवैध बांधकाम करीत नमुना परिसरात उभारलेल्या या इमारतीची पाडापाडी सुरू असतानाही संबंधित इमारत मालक तेथे फिरकला नाही. एखाद्या पाच मजली इमारतीवर हातोडा पडण्याचे अलीकडच्या काळातील हे पहिलेच उदाहरण आहे. नमुना गल्ली नं. ६ येथील नाल्याच्या उत्तरेस नाल्याच्या जागेसह नाल्यालगत २१७० चौरस फुटाची पाच मजली इमारत अतिक्रमण करून बांधण्यात आली. बांधकामाची महापालिकेकडून कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ४७८ मधील तरतुदी अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांकडून देण्यात आला होता. दस्ताऐवज सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली. मात्र त्यानंतरही जागेचा मालकी हक्कासंदर्भात कुणीही समोर आले नाही. त्या अनुषंगाने मंगळवारी सकाळी ११ वाजताच अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक नमुन्यात दाखल झाले व मजुरांनी हातोड्याच्या साह्याने ही इमारत पाडण्यास घेतली. विरोध झालाच नाही...अमरावती : सजेदा परवीन अजीज मनियार यांच्या ताब्यातील ही इमारत असल्याची माहिती महापालिकेला चौकशीअंती प्राप्त झाल्याने मंगळवारी प्रत्यक्ष इमारत पाडतेवेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या इमारतीचे धारक किंवा परिसरातील कुणीही विरोध करण्याची शक्यता लक्षात घेता महापालिका यंत्रणा सज्ज होती. अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. प्रत्यक्षात इमारत पाडण्यावेळी कुणीही विरोध केला नाही. त्यामुळे पालिका आणि पोलीस या उभय यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. (प्रतिनिधी)ही इमारत पाडण्यासाठी कुशल कामगार व अद्यावत साहित्य यंत्रणेबाबत निविदा मागविल्या. मंगळवार दुपारपर्यंत कुणीही निविदाधारक पोहोचले नाही. तथा इमारतधारकही पुढे आला नाही. उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे इमारत पाडण्यास सुरुवात केली.- गणेश कुत्तरमारे,प्रमुख, अतिक्रमण निर्मूलन पथक.
अखेर पाच मजली इमारतीवर हातोडा
By admin | Updated: May 4, 2016 00:20 IST