लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील हाथीपुरा भागातील मृत कोरोनाग्रस्ताच्या ६५ वर्षीय आईचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. यापूर्वी मंगळवारी मृताचे दोन भाऊ व पत्नीचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींची कोरोनाग्रस्त म्हणून नोंद आरोग्य विभागाने केली. यादरम्यान आयुक्तांनी जाहीर केलेल्या आठ कन्टोन्मेंटमध्ये आशाच्या १२० हून अधिक पथकांनी शुक्रवारपर्यंत ४८५७ गृहभेटी देऊन २६,४८४ नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेतली. यामध्ये ताप, सर्दी व खोकल्याचे ११ रुग्ण आढळून आलेत. मात्र, यापैकी कुणीही कोरोना संशयित नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.हाथीपुरा परिसरातील दोन किमी बफर झोनमध्ये २८ दिवस महापालिकेच्या आरोग्य पथकांचा वॉच आहे. मृताच्या घराकडे जाणारे रस्ते सील करण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा आहे. या परिसरात सर्दी, ताप व खोकला असणाऱ्या नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे. अद्याप या भागात कुणीच संशयास्पद रुग्ण आढळलेला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी दिली.महापालिका आयुक्तांनी जाहीर केलेल्या बफर झोनमध्ये आरोग्य पथकांनी शुक्रवारपर्यंत १७८४ गृहभेटी दिल्यात. यामध्ये ८७४८ नागरिकांच्या आरोग्याची माहिती त्यांनी घेतली. या भागात सर्दी, ताप व खोकल्याचे तीन रुग्ण आढळून आले असले तरी कोरोना संशयित नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगीतले. या भागात चार व्यक्ती बाहेरगावावरून आल्या आहेत आणि ३८ व्यक्ती दिल्लीतील निजामुद्दीन येथून आल्याचे पथकाच्या अहवालात नमूद आहे.आशा व एएनएमच्या पथकांनी शहरात ३९८९४ गृहभेटी दिल्यात. १,१८,०८९ नागरिकांची माहिती या पथकांनी घेतली आहे. या सर्वेक्षणात कोरोनाबाधित असलेले कुणीच आढळले नसले तरी सर्दी, ताप व खोकला असणारे ६५७ रुग्ण आढळले आहेत. महापालिकेचे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे व आयुक्त प्रशांत रोडे या प्रक्रियेकडे लक्ष ठेवून आहेत.रोज २ हजार व्यक्ती होम क्वारंटाईनमधून मुक्त३५ हजारांपेक्षा अधिक व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. यामध्ये ज्या व्यक्तींचा १४ दिवसांचा कालावधी संपलेला आहे, त्यांना यामधून मुक्त करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास १३ हजार व्यक्ती यामध्ये आहेत. आता दररोज दोन ते तीन हजार व्यक्तींचा गृह विलगीकरणाचा कालावधी संपणार आहे. सद्यस्थितीत हाय रिस्कच्या ९० व्यक्ती क्वारंटाइन आहेत. त्यांना होम क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पाच झाली. मृताचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर याच कुटुंबातील चार व्यक्ती क्वारंटाइन आहेत. हाथीपुरा भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारीमहानगरात पाच ठिकाणी फिव्हर क्लिनिक सुरूमहापालिकेच्या वतीने पाच ठिकाणी फिव्हर क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. बफर झोनमध्ये ताज व रॉयल पॅलेस, फरशी स्टॉफजवळील आयुर्वेदिक कॉलेज, राजापेठ येथील होमिओपॅथी कॉलेज व बडनेºयाच्या मोदी हॉस्पिटलचा यामध्ये समावेश आहे. या ठिकाणी तापाच्या रुग्णांनी जाऊन उपचार करून घ्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. येथील ओपीडीमधून संशयित कोविड-१९ किंवा ‘सारी’ रुग्ण आढळल्यास त्याला इर्विन रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.चार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्तीमहापालिका प्रशासनाद्वारे तात्पुरत्या स्वरूपात चार समुदाय आरोग्य अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये अंकुश मानकर हे फ्रेजरपुरा ओपीडी, वैशाली मोटे या मोदी हॉस्पिटलचे फिव्हर ओपीडी, दीपा देऊळकर या नमुना येथील फिव्हर ओपीडी व प्रतिभा पार्डीकर या यशोदानगर ओपीडी येथे कार्यरत राहणार आहेत. या ठिकाणी येणाºया रुग्णांचा अहवाल दररोज सायंकाळी आरोग्य विभागाकडे सादर करावा लागणार आहे.१० क्वारंटाईन केंद्रांची सद्यस्थितीवलगावजवळील संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात १७८, सामाजिक न्याय विभागाच्या निंभोरा येथील वसतिगृहात ११६७, महापालिकेच्या शाळा क्र. १३ मध्ये १२५, शाळा क्र. ३ मध्ये ९६, जिल्हा सामान्य रुग्णालयात १०, अमन पॅलेस ३७, रॉयल पॅलेस २८, जेल रोडवरील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात १०२ व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ९० व्यक्ती क्वारंटाइन करण्यात आलेल्या आहेत. याव्यतिरिक्त जिल्ह्यात ३५ हजारांवर व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत.
पाचवा कोरोनाग्रस्तही ‘त्या’ मृताच्याच कुटुंबातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:01 IST
हाथीपुरा परिसरातील दोन किमी बफर झोनमध्ये २८ दिवस महापालिकेच्या आरोग्य पथकांचा वॉच आहे. मृताच्या घराकडे जाणारे रस्ते सील करण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा आहे. या परिसरात सर्दी, ताप व खोकला असणाऱ्या नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे. अद्याप या भागात कुणीच संशयास्पद रुग्ण आढळलेला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी दिली.
पाचवा कोरोनाग्रस्तही ‘त्या’ मृताच्याच कुटुंबातील
ठळक मुद्देजिल्हा सद्यस्थिती । कन्टोन्मेट झोनमध्ये ताप, सर्दी खोकल्याचे ११ रुग्ण