कावली वसाड : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीला वेग आला आहे. बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
शेतातील काडीकचरा वेचून जमिनीची ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी, वखरणी तसेच आपल्या शेतातील धुरे, बांध जेसीबीच्या साह्याने व्यवस्थित करताना शेतकरी दिसत आहे. रासायनिक खताचे दर अधिकच वाढल्याने ते शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा शेणखताकडे वळविला आहे. शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात शेणखताची खरेदी सुरू केली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय असल्याने जनावरांची संख्या अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे शेणखताची निर्मितीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याने व ती शेतकऱ्यांना परवडणारी असल्यामुळे शेणखताची खरेदी वाढली आहे. शेणखतामुळे जमिनीचा पोत कायम राहत असल्याने यावर्षी शेणखताची खरेदी मोठ्या प्रमाणात केल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.
बॉक्स
शेणखताकडे वाढला शेतकऱ्यांचा कल
सध्या शेतकरी आपल्या शेतात शेणखत टाकत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी खरीप हंगामातील मशागतीला वेग आला आहे. कोरोनाला न जुमानता शेतीची कामे वेळेत पूर्ण करावी लागत असल्याने त्याकडे लक्षसुद्धा देत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
आर्थिक जुळवाजुळवीचे शेतकऱ्यांपुढे आव्हान
यंदा अल्प उत्पन्नामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ढासळलेली असली तरी येणाऱ्या हंगामात शेतीसाठी बी बियाणे आणण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करणे हे सर्व शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.