नवीन डीबीची मागणी : राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
मोर्शी : तालुक्यातील दापोरी परिसरात काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कमी दाबामुळे पिके संकटात सापडली आहेत. कृषिपंपांना कमी दाबाचा वीजपुरवठा होत आहे. शेतकऱ्यांना आपली पिके वाचविण्यासाठी कसरत करावी लागत असून, महावितरण कर्मचाऱ्यांची विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी तारांबळ उडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर दापोरी भागात नवीन विद्युत रोहित्र तात्काळ बसविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांच्या नेतृत्वात महावितरणच्या मोर्शी येथील कार्यालयात त्यासाठी शेतकऱ्यांनी ठिय्या दिला.
दापोरी परिसरात संत्रा, गहू, चणा, भाजीपाला, उन्हाळी भुईमूग, पालेभाज्या आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. मात्र, मंगेश कोल्हे यांचे शेतातील डीबी ओव्हरलोड असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मोटर पंप सुरळीत चालत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही.
दरम्यान, दापोरी येथे अशोक राऊत यांच्या शेतात नवीन डीबी लावण्याकरिता सन २०१९ मध्ये महावितरणकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्याची साधी दखलसुद्धा महावितरणकडून घेण्यात आली नाही. आठ दिवसांच्या आत अशोक राऊत यांच्या शेतात प्रस्तावित असलेली नवीन डीबी बसवून वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा रूपेश वाळके यांनी दिला. यावेळी अंकुश घारड, अमोल दाणे, प्रकाश राऊत, विनोद अढाऊ, अशोक राऊत, प्रकाश फलके, राजाभाऊ दाणे, राहुल सालबर्डे, गजानन दाणे, अमोल म्हस्के, गजानन ठाकरे, रमेश दाणे, विजय दाणे, विलास वानखडे, शंकर घ्यार, सुरेश सलबर्डे आदी शेतकरी उपस्थित होते.