सावंगी (जिचकार) : गावामध्ये अवैैध गावठी दारुविक्रीला उधाण आल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. यामुळे गावतील शांतता भंग पावत असून गल्लीबोळात तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत दारु पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्र्गावर आहेत. विद्यार्थीदेखील दिशाहीन होऊ लागले आहेत. परिसरातील विद्यार्थ्यांच्या हाती लेखणीऐवजी दारुची बाटली दिसू लागली आहे. येथील दारूविक्री बंद करण्यासाठी महिला तसेच ग्रामपंचायतीनेसुध्दा तक्रारी केल्यांनतर पोलिसांनी बुधवारी धाडसत्र राबवून तीन दारुविक्रेत्यांना अटक केली. यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सावंगी परिसरात गत अनेक दिवसांपासून अवैैध दारु विक्रीला उधाण आले आहे. परिणामी किरकोळ भांडणांचे प्रकारही वाढले आहेत. गावात दारुचा महापूर आल्याने महिलांना रस्त्याने चालणे कठीण झाले आहे. मद्यपींचा हैदोसही वाढला आहे. शिवीगाळ, मारहाणीच्या घटना तर वरचेवर घडतच असतात. गावामध्ये दिवसागणिक दारुविक्रीच्या दुकानांची संख्याही वाढत चालल्याने शांतताप्रिय नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. दारू सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने युवापिढी व्यसनाधीन होत आहे. मद्यपी त्यांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी चोरीचा मार्ग पत्करताना दिसत आहेत. त्यामुळे शेतमालाच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शेतातील कृषी साहित्य चोरीला जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तसेच भुरट्या चोऱ्यादेखील वाढल्या आहेत. चोरटे परिसरात हैदोस घालून विद्युत वायरसह कापूस, संत्रा चोरुन नेल्याच्या तक्रारी वाढत आहेत. शेतकरी याबाबत तक्रार करण्यास धजावत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढत चालले आहेकाही दिवसांपूर्वी पोलिसांनी अवैैध दारुविक्रीच्या दुकानावर धाडसत्र राबविले होते. यावेळी शेकडो लिटर दारु जप्त करण्यात आली होती. परंतु दारुविक्रेत्यांना राजाश्रय मिळत असल्याने दारुविक्रीमध्ये घट होण्याऐवजी वाढ होत असल्याचे चित्र सावंगीमध्ये दिसत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारी गावात गावठी दारुची रेलचेल असते. दारु विक्रेत्यांविरुध्द येथील ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य तसेच महिलांनी कंबर कसली असून वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत सावंगी परिसरात ग्रामीण पोलिसांनी धाडसत्र राबविले. यामध्ये तीन दारु विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे अवैध गावठी तसेच देशी, विदेशी दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून सावंगीतून अवैध दारुविक्री हद्दपार करण्याकरिता ग्रामस्थसुध्दा पोलिसांच्या मदतीला सज्ज झाले आहेत. (वार्ताहर)
गावठी दारू ठरतेय कुटुंबांचा कर्दनकाळ!
By admin | Updated: July 3, 2015 00:34 IST