उमेदवारांची भाऊगर्दी : प्रचारासाठी अत्यंत कमी अवधीगणेश वासनिक - अमरावतीआघाडी, युतीत झालेली ताटातूट आणि बसप, मनसेचे उमेदवार स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे मताधिक्य घसरण्याची शक्यता आहे. शनिवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांनी केलेली गर्दी पाहता या शक्यतेला बळ मिळत आहे. जिल्ह्यात आठही मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे, बसपचे उमेदवार रिंगणात कायम राहावेत, अशी पक्षस्तरावर नेत्यांनी तयारी चालविली आहे. १ आॅक्टोबरपासून निवडणूक प्रचारात खरी रंगत येईल. मात्र, पक्षाने दिलेल्या उमेदवाराची प्रतिमा बघूनच मतदार पुढील निर्णय घेतील, असे दिसून येते. काही मतदारसंघांमध्ये दुहेरी तर काही मतदारसंघात तिहेरी लढतीचे संकेत आहेत. जिल्ह्यात अनेक दिग्गजांनी निष्ठा आणि वैचारिकतेला तिलांजली देऊन आमदारकीसाठी पक्षांतर केले. दोन दिवसांपूर्वी जे नेते राष्ट्रवादीत होते आता ते शिवसेना, भाजपात गेले आहेत. ज्यांना राष्ट्रवादीची ‘अॅलर्जी’ होती, आता ते राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाताला बांधून प्रचार करीत आहेत. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने क्षणातच पक्षांतर करण्याचा अनुभव मतदारांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत आला. उमेदवारांची गर्दी लक्षात घेता प्रमुख पक्षांमध्येच काट्याची टक्कर होण्याची चिन्हे आहेत. यावेळी काहींना दुसऱ्यांदा तर काहींना तिसऱ्यांदा आमदार होण्याचे वेध लागले आहेत. परंतु उमेदवारांची गर्दी बघता मतांचे विभाजन अटळ आहे. परिणामी सर्वच उमेदवारांचे मताधिक्य घसरण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी, भाजप- सेनेची युती संपुष्टात आल्यामुळे या पक्षाचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच मनसे, बसप, रिपाइं, अपक्षांचीही गर्दी आहे. मात्र, काही मतदारसंघांमध्ये अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन पाठिंब्याचा आणि पुढील ‘व्यवहारा’चा मार्ग खुला ठेवला आहे. आघाडी, युती संपुष्टात आल्याने वेळेवर उमेदवार शोधण्यासाठी सर्वच पक्षांची तारांबळ उडाली. बहुतांश पक्षांना बाहेरुन उमेदवार आयात करावे लागले त्यामुळे एकूण चित्र पालटले आहे.
मताधिक्य घसरणार
By admin | Updated: September 29, 2014 00:31 IST