मामाच्या ‘फायनल’पूर्वी भाच्यासह पाच जणांची एक्झिट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 05:00 AM2022-03-28T05:00:00+5:302022-03-28T05:00:45+5:30

अनिकेतच्या सोयरिकीच्या अंतिम बोलणीसाठी पोकळे, दारोकार व गाडगे कुटुंब शिरजगाव कसबा येथे चालले होते. मात्र, गाव सोडताच अमरावती शहराच्या बाहेरून जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या कुटुंबाला घेऊन जाणाऱ्या वाहनाचा वेेगदेखील अनियंत्रित होता. त्यामुळे धडकेत समोरचा भाग चक्काचूर झाला. मागे बसलेले गंभीर जखमी झाले. आठ वर्षीय चिमुकल्याच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला.

Exit of five people including niece before Mama's 'Final'! | मामाच्या ‘फायनल’पूर्वी भाच्यासह पाच जणांची एक्झिट!

मामाच्या ‘फायनल’पूर्वी भाच्यासह पाच जणांची एक्झिट!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती/अंजनगाव बारी : अंजनगाव बारीच्या अनिकेत सुरेश पोकळे (२७) या पुण्याला नोकरी करणाऱ्या मुलाचे साक्षगंध कार्यक्रमानिमित्त पोकळे कुटुंब व जवळचे आप्त आनंदात शिरजगावकडे निघाले. त्यात अनिकेतच्या वडिलांसह दोन्ही काका, काकू, आतोई, चुलत बहीण, भाचा, भाची असे सारे आप्त होते. अनिकेत दुसऱ्या वाहनाने पुढे गेला होता. मागच्या वाहनाला अपघात झाल्याचे कळताच तो क्षणात परतला. तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले. त्याचे मोठे वडील, मोठी आई, काका, मामाजी व चिमुकला भाचा यांचे मृतदेह त्याच्या पुढ्यात होते. अख्खा नूर पालटला. साक्षगंध राहिले अन् त्याला इर्विनमध्ये आप्तांसाठी, त्यांच्यावरील उपचारासाठी धावाधाव करावी लागली. 
रहाटगाव रिंगरोडवरील एका हॉटेलसमोर झालेल्या भीषण अपघातात चालक रोशन रमेश आखरे (२६), सुभाष भाऊराव पोकळे (६०), प्रतिभा सुभाष पोकळे (५०), विजय भाऊराव पोकळे (५५, तिघेही रा. अंजनगाव बारी), कृष्णा सचिन गाडगे (८, रा. शिरजगाव कसबा) व गजानन संतोषराव दारोकार (४५, रा. जरूड) यांचा मृत्यू झाला. यातील रोशन हा वाहनचालक-मालक होता, तर ललिता विजय पोकळे (५०), सुरेश भाऊराव पोकळे (५८, सर्व रा. अंजनगाव बारी), संगीता गजानन दारोकार (३५, रा. जरूड), रश्मी सचिन गाडगे (३५, रा. जरूड) व पिहू सचिन गाडगे (वय सहा महिने) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. यातील गजानन दारोकार हे अनिकेतच्या आत्याचे पती होते, तर प्रतिभा या काकू, विजय हे काका, तर कृष्णा हा भाचा होता. 

सचिन गाडगे शून्यात
पत्नी व मुले माहेरी असताना सचिन गाडगे हे शिरजगावातच होते. अपघाताची वार्ता कळताच ते अमरावतीत  पोहोचले. शून्यात हरविलेल्या सचिन यांनी पत्नी व चिमुकल्या मुलीची भेट घेऊन जड अंत:करणाने पोटच्या मुलाचे कलेवर हाती घेतले. हमसून हमसून रडताना त्यांचे रुदन आसमंत भेदणारे होते. जड अंत:करणाने रविवारी सायंकाळी त्यांनी मुलाच्या पार्थिवावर गावी नेऊन अंत्यसंस्कार केले, तर त्यांचे डोळे इकडे अमरावतीत उपचार घेत असलेल्या पत्नी व मुलीकडे लागले होते.

फायनल सोयरिकीसाठी चालले होते शिरजगावला
अनिकेतच्या सोयरिकीच्या अंतिम बोलणीसाठी पोकळे, दारोकार व गाडगे कुटुंब शिरजगाव कसबा येथे चालले होते. मात्र, गाव सोडताच अमरावती शहराच्या बाहेरून जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या कुटुंबाला घेऊन जाणाऱ्या वाहनाचा वेेगदेखील अनियंत्रित होता. त्यामुळे धडकेत समोरचा भाग चक्काचूर झाला. मागे बसलेले गंभीर जखमी झाले. आठ वर्षीय चिमुकल्याच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला.

रश्मीने गमावला मुलगा
शिरजगाव कसब्याची रश्मी सचिन गाडगे ही एका लग्नासाठी माहेरी अंजनगाव बारीला आली होती. रविवारी  आठ वर्षीय चिमुकला कृष्णा व सहा महिन्यांच्या पिहूला सोबत घेऊन ती वडील, आई, काका व अन्य आप्तांसह सासरी शिरजगाव कसब्याकडे निघाली. या अपघातात ती जखमी झाली, तर तिच्या कृष्णाचा मृत्यू झाला. पिहूच्या डोक्याला दुखापत झाली. सहा महिन्यांची ती चिमुकली डोक्याला बँडेज लावलेल्या स्थितीत मावशीच्या हातात विसावली होती. प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू व चंदू खेडकर यांनी त्या लहानगीला तातडीने खासगी रुग्णालयात हलविले. कृष्णावर सायंकाळी ५ च्या सुमारास शिरजगाव कसबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिन गाडगे हे घटनेच्या वेळी शिरजगावातच होते. 

किंकाळ्या, आक्रोश अन् अंत्यसंस्कार

बडनेरा : अंजनगावावर रविवारी शोक पसरला होता. प्रत्येकाच्या डोळ्यांत दु:खाश्रू होते. दोन्ही कुटुंबांत केवळ रडण्याचा आवाज होता. सायंकाळी तीन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील दुकाने बंद होती. व्यवहार ठप्प होते. दुपारी ४ वाजता वाहनचालक रोशन आखरे याचा मृतदेह गावात पोहोचला. त्यानंतर सायंकाळी प्रतिभा पोकळे व विजय पोकळे दीर-भावजय या दोघांचे मृतदेह विच्छेदन आटोपल्यानंतर पोहोचले. अंत्यसंस्कारांसाठी मोठी गर्दी जमली होती. दोन्ही कुटुंबांत रडण्याचा आक्रोश होता. प्रतिभा पोकळे यांच्या मुलीचा दहा दिवसांपूर्वीच विवाह झाला. त्यांच्याच पुतण्याच्या सोयरीक संबंधासाठी हे कुटुंब निघाले होते. सायंकाळी पुन्हा सुभाष पोकळे यांच्या मृत्यूने सारे सुन्न झाले. 

सहा महिन्यांपूर्वीच घेतले होते वाहन
इलेक्ट्रिक फिटिंग करणाऱ्या रोशनने सहा महिन्यांपूर्वीच जुने प्रवासी वाहन घेतले होते. रविवारी सकाळी एका सोयरिकीसाठी शिरजगावला जायचे आहे, असा निरोप त्याला पोकळे कुटुंबाकडून आला. रविवारी सकाळी मित्रांची भेट घेतानाच त्याने भाडे घेऊन शिरजगावला जात असल्याचेदेखील सांगितले. मात्र, चालक-मालक असलेल्या रोशनसाठी ती ट्रिप शेवटचीच ठरली.

राज्यमंत्री बच्चू कडू  पोहोचले इर्विनला
प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू वसू यांनी त्या भीषण अपघाताची माहिती दिल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू हे रविवारी दुपारी १२ च्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले. तेथे त्यांनी शिरजगाव कसब्याच्या रश्मी गाडगे हिची विचारपूस केली तथा अन्य जखमींची भेट घेतली. उपस्थित डॉक्टरांकडून माहिती जाणून घेतली व त्यांना जलद उपचाराबाबत सूचना केल्या. अपघाताची माहिती मिळताच हातची सारे कामे सोडून ते घटनास्थळीदेखील पोहोचले होते. 

 

Web Title: Exit of five people including niece before Mama's 'Final'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात