अमरावती : विद्यापीठ, महाविद्यालयीन उन्हाळी-२०२१ परीक्षांचे शुल्क माफ करावे आणि उन्हाळी-२०२० परीक्षेचे शुल्क परत करावे, अशी मागणी अभाविपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केला. सद्यस्थितीत रोजगार आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत उन्हाळी-२०२१ ऑनलाईन परीक्षांचे शुल्क भरण्यास विद्यार्थी असमर्थ आहेत. विद्यार्थ्यांना या लॉकडाऊनमध्ये अनेक समस्या भेडसावत आहे. त्यामुळे उन्हाळी परीक्षांचे शुल्क माफ करण्यात यावे.
ऑनलाईन परीक्षेच्या वेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी विद्यापीठाने एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घेण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी हेल्पलाईन नंबर सुरू करावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठाने ऑनलाईन सेमिनारचे आयोजन करावे. ज्या महाविद्यालयांमध्ये नियमित आभासी पद्धतीने वर्ग घेतले जात नाही, अशा महाविद्यालयांची चौकशी करून कारवाई करावी. बॅकलॉगचे निकाल लागलेले नाही, ते त्वरित लावण्यात यावे. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना प्रकल्प असतात. हे प्रकल्प बाहेरील संसाधनांवर अवलंबून असतात. टाळेबंदीच्या काळात यावर काही तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी अभाविपचे महानगर मंत्री चिन्मय भागवत यांनी केली आहे.