धामणगाव रेल्वे : आपल्या गावात प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळावे, प्रत्येक कुटुंबाच्या घरासमोर शोषखड्डा असावा, जैविक विविधतेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, वृक्षलागवड अशा विविध उपक्रम राबवले जात असून, प्रत्येकाने गाव समृद्ध करण्यासाठी शपथ घेऊन गाव विकासात सहकार्य करण्याचे आवाहन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी केले.
धामणगाव रेल्वे पंचायत समितीत राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत आमचं गाव आमचा विकास अंतर्गत तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या सचिव प्रशासकांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी गावात पशुधनाच्या संख्येच्या प्रमाणानुसार पाणवठे बांधणे, प्रत्येक कुटुंबाने कचऱ्याचे वर्गीकरण करणे, गरोदर माता स्तनपानासाठी कक्ष उभारणे, गावात जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देणे, शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा करण्यासाठी दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसायाला प्राधान्य ध्यावे, मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रचार व जनजागृती, महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देणे अशा विविध योजना या कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणार आहे. यात प्रत्येक ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे मत गट विकास अधिकारी माया वानखडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती महादेव समोसे, तर प्रमुख अतिथी उपसभापती माधुरी दुधे, पंचायत समिती सदस्य शुभम भोंगे, राजकुमार केला हे होते. मास्टर ट्रेनर सुधाकर उमप, पांडुरंग उलेमाले, पंकज आमले यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. प्रशासकीय अधिकारी प्रशांत जोशी, विस्तार अधिकारी किशोर चव्हाण, मिलिंद ठुनुकले, पवार केंद्रप्रमुख दिलीप चव्हाण, अजय बावणे डी. एस. राठोड, प्रवीण आखरे, प्रवीण राठोड, खान यांच्यासह प्रशासक व ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.