अमरावती : बडनेरा मार्गावरील नवाथेनगर मार्गालगत असणाऱ्या भंगार व्यवसायिकाचे अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी सकाळी हलविले. काही वर्षांपासून नवाथे नगर चौकात गुलाबचंद साहू यांनी मार्गालगतच्या फुटपाथवर भंगार व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे वाहतुकीसह पायदळ जाणाऱ्या नागरिकांना मार्गाहूनच जावे लागत होते. अनेकदा भंगाराचे अतिक्रमण हलविण्यात आल्यावरही पुन्हा गुलाबचंद साहू यांनी अतिक्रमण करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. मंगळवारी पुन्हा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई केली. महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत भंगाराचे सामान, ड्रम, सोफा, पत्रे, तराजू काटा, लकडी पल्ले, दूध कॅन, कापडी गठ्ठे आदी साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमण काढताना गुलाबचंद साहू यांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे साहू याला राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी अतिक्रमण विभागाचे निरीक्षक उमेश सवई यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी होते.
नवाथेनगरातील अतिक्रमण हलविले
By admin | Updated: February 25, 2015 00:28 IST