वाहतुकीची कोंडी : आॅटोचालकांचाही मनमानी कारभारअमरावती : शहरवासीयांना वाहतुकीचे वळण लावताना पोलीस प्रशासन हतबल झाले आहे. एकीकडे प्रवासी वाहतूकदारांचा मनमानी कारभार सुरुआहे. पंचवटी चौकात कालीपीली वाहने व खासगी ट्रॅव्हल्सने मार्ग अतिक्रमण करून प्रवाशांना वेठीस धरत आहे. त्यातच आॅटोचालकांच्या मनमानीमुळे वाहतुकीची कोंडी होऊन सामान्य जनतेला त्रास करावा लागत आहे. शहरात वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न पोलीस प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील काही मुख्य चौकातील वाहतूक सुरक्षित होताना दिसून येत आहे. मात्र, तरीसुद्धा शहरात चौकांमध्ये प्रवासी वाहतूकदारांचा मनमानी कारभार सुरूच आहे. स्थानिक पंचवटी चौकात असाच प्रकार रोज पाहायला मिळत आहे. गाडगेनगर परिसरातील मार्ग कॉलेज रोड म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळे दिवसभर मार्गावर विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यातच वलगाव ते परतवाडा, मोर्शी व नागपूर मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक आहे. या मार्गावरील गावे व शहराकडे जाणारी मंडळी पंचवटी चौकातच वाहनांची प्रतीक्षा करतात. प्रवासी मार्गावर उभे राहूनच एसटी, ट्रॅव्हल्स व खासगी वाहनांची प्रतीक्षा करतात. पंचवटी चौकातील फुटपाथवर अनेकांनी व्यापार थाटल्यामुळे प्रवाशांना मार्गावर थांबावे लागते. त्यातच आॅटोचालक चौकात आॅटो थांबून प्रवाशांना आॅटोत बसण्याचा तकादा लावताना दिसून येतात. परिणामी मागील सर्व वाहतूक आॅटो समोर सरकण्याची प्रतीक्षा करतात. त्याचप्रमाणे काही खासगी वाहनेसुध्दा चौकात वाहन उभे करून प्रवाशांना बोलाविण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरक्षित वाहतूक करण्याच्या प्रयत्नात चौकाचौकांत फिरून नियोजनबद्ध कामकाज करीत आहेत. त्याच खात्यातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठांच्या कामकाजावर पाणी फेरत असल्याचे चित्र अमरावती शहरात पाहायला मिळत आहे. प्रवासी वाहतूकदारांच्या या मनमानी कारभारामुळे एखादा मोठा अपघात किंवा एखादी घटना टाळता येणे पोलीस विभागालाही शक्य होणार नाही. शेवटी काहीही अपरिचीत घटना घडल्यास पोलीस विभागालाच दोषी ठरविले जाणार आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आता कठोर भूमिका घेऊन वाहतुकीच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)फुटपाथवर अतिक्रमण पंचवटी चौकातील फुटपाथवर व्यावसायिकांनी व्यापार थाटून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तेथे थांबणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. शीतपेय विक्रेत्यांची दुकानाबाहेर असलेल्या फुटपाथवर ग्राहकांना बसण्याची व्यवस्था केल्याने अर्धे अधिक नागरिक मार्गावर उभे राहून शीतपेयाचा आनंद घेतानाही दिसत आहे. त्यामुळे त्या मार्गाने जाणाऱ्या वाहनांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत पंचवटी चौकातून वलगाव, परतवाडा व नागपूर मार्गाने जाणारी वाहने मोठ्या संख्येने उभी राहतात. त्यामध्ये काली पिली व खासगी ट्रॅव्हल्स मार्गालगतच वाहने उभी करून प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. शहरात काली-पीली व खासगी ट्रॅव्हल्सला येण्यास मनाई आहे. मात्र, तरीदेखील नियमांना फाटा देत खासगी ट्रॅव्हल्स व कालीपीली पंचवटी चौकात उभी राहत आहेत. त्यातच याच वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक केली जात आहे. महापालिकेने नागरिकांसाठी नवीन बस थांबे तयारी केली आहेत. मात्र, त्या ठिकाणी खासगी वाहनांचाच बोलबाला आहे. पीडीएमसी प्रवेशद्वारालगतच्या भिंतीजवळील बस स्टॉपसमोरच काली-पीली उभी राहत असल्यामुळे फुटपाथसुद्धा झाकल्या गेले आहे. वाहतूक पोलिसांचा नाही वचकपंचवटी चौकात वाहतूक पोलीस तैनात आहेत. मात्र, ते चौकातील एका झाडाखाली उभे राहून दुरूनच वाहतूक नियंत्रण करताना आढळून येतात. पंचवटी चौकातून नागपूर जाणाऱ्या मार्गावर अनेक वाहने मार्गावर उभे राहून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. मात्र, वाहतूक पोलीस निगरगट्ट भूमिका घेऊन केवळ सिटी मारण्याशिवाय काही करत नसल्याचे दिसून येते. सिटी मारूनही काही खासगी वाहने व आॅटोचालक मार्ग मोकळा करीत नसल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवरही पोलिसांचा वचक नसल्याचे आढळून आले आहे.
पंचवटी चौकात काली-पिली खासगी ट्रॅव्हल्सचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 00:04 IST