अंजनसिंगी : येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळखुटा या गावातील रस्त्यांवरही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण काढण्यासाठी गावातील तरुणांनी शासनाकडे धाव घेतली आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा हे गाव तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथील मंदिरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. त्यामुळे गावाच्या मुख्य रस्त्याने वाहनांची वर्दळ असते. मात्र, गावातील मुख्य रस्त्याच्या मधोमध, कुठे रस्त्याच्या कडेला जनावरे बांधली जातात. कुणाकडून बैलबंडी, तर मधोमध ट्रॅक्टरही उभा केला जातो. काही लोकांनी मुख्य रस्ता व्यापून घराचे बांधकामसुद्धा केले आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून चालणे नागरिकांना कठीण झाले आहे. रस्त्यावर अतिक्रमण असल्यामुळे वाहने नेण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. यामुळे मुलांना खेळण्यासही जागा शिल्लक नाही. भरधाव वाहनांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
गावातील वाढते अनधिकृत अतिक्रमण, वाहनांची वर्दळ पाहता एखाद्या वेळेत प्राणांतिक अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या संवेदनशील बाबीकडे सरपंच, उपसरपंच व सदस्यसुद्धा लक्ष देत नाहीत. गावातील अतिक्रमण काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता योगेश भेंडे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह पिंपळखुटाचे ग्रामसेवक, सरपंच यांना निवेदन देऊन गावातील अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.
------