अमरावती : मोर्शी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या दोन्ही पदांसाठी येत्या २० मार्च रोजी निवडणूक होणार आहे. याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जाहीर केला आहे.
मोर्शी पंचायत समितीवर भाजपची सत्ता आहे. १० सदस्य असलेल्या या पंचायत समितीत भाजपचे ६, शिवसेना २ आणि कॉंग्रेस व भाकप यांचे प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपच्या अंतर्गत करारानुसार विद्यमान सभापती यादवराव चोपडे आणि उपसभापती माया वानखडे यांचा सव्वा वर्षांचा कार्यकाळ या पदावर पूर्ण केला व आपल्या पदाचा राजीरामा संबंधिताकडे सोपविला.
जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दयाराम काळे यांच्याकडे ८ मार्च रोजी तात्पुरता प्रभार सोपविण्यात आला असतानाच जिल्हा प्रशासनाने सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक जाहीर केली. मोर्शीचे तहसीलदार निवडणुकीचे कामकाज पाहणार आहेत.
------------
असा आहे निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशपत्रे स्वीकारण्याची वेळ २० मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी १ अशी आहे. सभेचे कामकाज दुपारी २ पासून सुरू होईल. २ ते २.१० या वेळेत उमेदवारांची छाननी होईल. अडीचच्या सुमारास माघार घेतलेल्या व रिंगणातील उमेदवारांची नावे वाचून दाखविली जातील व आवश्यक असल्यास दोन्ही पदांकरिता मतदान व त्यानंतर लगेच मतमोजणी होईल.