अर्थकारण : आघाडीच्या नेत्यांमध्ये चिंता वाढलीअमरावती : महापालिकेत सप्टेंबर महिन्यात महापौरपदाची निवडणूक होणार आहे. सर्वसाधारण महिला राखीव प्रवर्गाकरिता महापौरपद आरक्षित आहे. त्यामुळे बहुतांश महिला नगरसेविका महापौरपदी आरुढ होण्याचे स्वप्न बघत आहेत. मात्र, नेत्यांच्या डोक्यात मात्र विधानसभा निवडणूक असल्याने या अनुशंगानेच महापौरपदाचा उमेदवार निश्चित होणार, अशी नवी राजकीय खेळी महापालिकेत सुरु झाली आहे. तर दुसरीकडे महापौरपदाच्या निवडणुकीत अनेक सदस्यांनी ‘लक्ष्मी’ ची प्रतीक्षा चालविली आहे.विद्यमान महापौर वंदना कंगाले यांचा कार्यकाळ ९ सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यभरातील २६ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत गतआठवड्यात काढली. यात अमरावती महापालिकेत सर्वसाधारण महिला राखीव प्रवर्गासाठी महापौरपदाचे आरक्षण घोषित करण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना, बसपा, जनविकास-रिपाइं आदी सर्वच पक्षाच्या नेत्यांना महापौरपद हवे आहे. मात्र, पदासाठी आवश्यक ४४ इतके संख्याबळ हे कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडेच असल्याने आघाडीचाच महापौर बनेल, असे हल्ली चित्र आहे. महापौरपदाच्या निवडणुकीपेक्षा ‘टार्गेट विधानसभे’ला प्राधान्य असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कामाला लागले आहेत. महापौरपद कायम ठेवत असताना विधानसभा निवडणुकीत जराही धक्का लागणार नाही, असे समिकरण जुळविले जात आहे. एकीकडे महापौरपद कोणत्या पक्षाच्या वाट्याला, हे निश्चित झाले नसताना अपक्षासह अन्य सदस्यांनी या निवडणुकीत ‘लक्ष्मी’ कशी येईल, याचे गणित जुळविण्यास प्रारंभ केला आहे. पक्षादेश झुगारण्याची अनेक सदस्यांची तयारी देखील आहे. महापौरपदाची निवडणूक विधानसभा निवडणुकीपूर्वी असल्याने नेत्यांची गाठ विधानसभा निवडणुकीत नगरसेवकांसोबत राहणार आहे. ‘अब हमारी बारी’ या वाक्यप्रयोगाचा पुरेपूर लाभ घेण्याची तयारी काही नगरसेवकांनी चालविली आहे. आर्थिक लाभ डोळ्यांसमोर ठेवत काही सदस्यांनी मोट बांधली असून एका नामवंत सदस्याच्या हाती धुरा सोपविण्याची शक्कल लढविली जात आहे. त्यामुळे महापौरांच्या निवडणुकीत अर्थकारण मोठ्या प्रमाणात चालण्याची शक्यता आहे. महापालिकेतील पक्षनेता, गटनेत्यांच्या डोक्याला यामुळे नवा ताप लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र अस्वस्थ झाले आहेत.
निवडणूक महापौरांची; लक्ष्य विधानसभेवर
By admin | Updated: August 20, 2014 23:14 IST