जागतिक चिमणी दिन : उन्हाळ्यात पक्ष्यांची तहान भागविण्याचा उपक्रम
परतवाडा : उन्हाळा लागताच माणसांसह प्राणी व पशूपक्ष्यांच्या जिवाची लाहीलाही होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सल्लेही दिले जातात. मात्र, या शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी दरवर्षीप्रमाणे झाडांवर जलपात्र टांगून शनिवारी जागतिक चिमणी दिन साजरा केला. यामध्ये विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने जबाबदारी घेत सहभाग नोंदविला.
वाढते तापमान व उष्माघातामुळे चिमणी व इतर पक्ष्याची संख्या कमी होत आहे. पक्षी पाण्याअभावी होरपळून मरतात. मोबाईल टॉवर, फ्रिक्वेंसी, रेडिएशनमुळे पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. वनविभागाच्या पुढाकाराने वृक्षांसह पक्षी वाचवा मोहिमेचा विडा आदिवासी पर्यावरण संघटनाचे अध्यक्ष योगेश खानजोडे, सचिव सुरेश प्रजापती, संजय डोंगरे, प्यारेलाल प्रजापती, राजकुमार बरडिया यांनी शहरातील विविध अधिकारी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांसोबत उचलला आहे.
यांनी घेतली जबाबदारी, तुम्ही केव्हा घेणार?
जलपात्रामध्ये पाणी टाकण्यासह चिऊताई व पक्ष्यांना खाण्यासाठी टाकण्याची जबाबदारी टिम्बर डेपो परिसर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांनी घेतली. वाघामाता परिसरात मिश्रा गुरुजी, प्रफुल वानखडे, जयस्तंभवरील शिवतीर्थ परिसर प्रवीण डाखोडे, राजू तायडे यांच्या हस्ते, तर नगर परिषद परिसर उपाध्यक्ष शशिकांत जैस्वाल, नियोजन सभापती बंटी उपाध्याय, ठाणेदार सदानंद मानकर, सहायक पोलीस निरीक्षक गोरे, नाझीम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, पीकेव्ही परिसरात आरएफओ अशोक माकडे, मधुकर रेचे व इतरही अधिकारी-कर्मचारी सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली.
-------------