दर्यापूर : राज्य परिवहन महामंडळ कोरोना लॉकडाऊनमुळे जमीनदोस्त झाले आहे. उत्पन्न बंद असल्याने एसटी महामंडळ व कर्मचारी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. लॉकडाऊनमुळे बस स्थानकावरील भारवाहकावरसुद्धा उपासमारीची वेळ आली आहे.
जिच्यामुळे आयुष्य घडले, त्या ‘लाल परी’चे कोरोनाच्या संकटात आर्थिक भरारीरूपी पंख कापले गेल्याने दर्यापूर बसस्थानकवरील दिलीप आनंदराव गवई हे भारवाहक (क्रमांक ३१३२) यांच्यावर आर्थिक संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे. दर्यापूर येथूल एसटी वाहतूक बंद असल्याने त्यांच्या कुटुंबाची रोजीरोटी बंद झाली. त्यामुळे बस डेपो कधी चालू होणार, याच्या प्रतीक्षेत हे भारवाहक आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे आता काही प्रमाणात बसफेऱ्या सुरू व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वडिलोपार्जित हीच रोजीरोटी असल्याने अन्य व्यवसाय करणार तरी कुठला, असा दिलीप गवई यांचा प्रश्न आहे.