घातपाताचा संशय
अमोल कोहळेलोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : वनविभागाकडून आटोकाट प्रयत्न करूनही पोहरा जंगलात वणव्याला हिवाळ्यातच प्रारंभ झाला. पोहरा बीटच्या वनखंड क्रमांक ४२ मधील ५० हजार साग रोपवनातील साडेबारा हजार झाडे ऐन हिवाळ्यात शुक्रवारी रात्री धडधडा पेटली. वन्यप्राणी जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटले. अखेर वनकर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोन तासांत आग विझविली. यातील आरोपी हुडकून काढण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत पोहरा वर्तुळातील पोहरा बीटमध्ये ३३ कोटीतील ५० हजार सागरोपांची लागवड असलेले रोपवन शुक्रवारी दुपारी पेटले. यात ५ हजार सागाची मोठी झाडे खाक झाली. वनकर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविली. परंतु, तीव्र हवेमुळे सुमारे पाच हेक्टर रोपवन वणव्याच्या विळख्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. आग विझविताना चार ब्लोअर मशीनचा वापर करण्यात आला. दोन तासांच्या महत्प्रयासाने ही आग आटोक्यात आली. ही आग हेतुपुरस्सर लावल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला असून, आरोपी हुडकून काढण्याचे आदेश देण्यात आले. वडाळी वनपाल श्याम देशमुख, वनरक्षक डी.ओ. चव्हाण, चंद्रशेखर चोले, वनमजूर, संरक्षण मजूर यांनी परिश्रम घेतले.
१५ दिवसांपूर्वीही रोपवनाला आगपंधरा दिवसांपूर्वी पोहरा वर्तुळातील परसोडा बिटमधील रोपवनाला आग लागली. त्या आगीत दोन हेक्टर रोपवन जळाल्याने मिश्र रोपांचे नुकसान झाले, तर शुक्रवारी पाच हेक्टर सागाच्या रोपवनाला आगीने विळख्यात घेतले. उन्हाळ्यात जंगलाला आगी लागण्याच्या घटना घडतात. मात्र, आता हिवाळ्यात विनाहंगामी आगीच्या घटनांनी घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.