अमरावती : दारू ढोसून एका मद्यपीने दारूच्या नशेत भरधाव चारचाकी वाहनाने कोविड रुग्णालयात कोरोना आरटीपीसीआर चाचणीला घेऊन जाणाऱ्या मेळघाटातील चुर्णी येथील रुग्णवाहिकेला मागून धडक दिली. यात रुग्णवाहिकेच्या चालकाने प्रसंगावधान ठेवल्याने मोठा अपघात टळला. मात्र रुग्णवाहिकेचे किरकोळ नुकसान झाले आहे. ही घटना पोलीस वाहतूक शाखेनजीक काही अंतरावर बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, अंजनगाव येथील एमएच२७-एसी ६४३० च्या चालकाने दारु ढोकून चारचाकी वाहने चालविले तोे पंचवटी चौकातून इर्विन रुग्णालयाकडे येत असताना त्याने अनेक वाहनांना कट मारले तसेच एक मुलगी थोडक्यात बचावली, असे रुग्णवाहिकेच्या चालकाने सांगितले. मेळघाटातील चुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीनच रुग्णवाहिका मिळाली. चुर्णी येथून आरटीपीसीआर चाचणी स्वॅब घेऊन येत असताना वाहतूक शाखेच्या कार्यालयानजीक त्यांना चारचाकी वाहनाने धडक दिली. चालकाने कसीबशी वाहन बाजूला लावले. चारचाकी वाहनाचे चालक दारुच्या नशेत धून होता. तो चालक वाहनात झोपला त्यानंतर गाडगेनगर ठाण्याचे एक शिपाई तेथे पोहचले त्यांनी दारुड्याला वाहनाच्या खाली उतरविले. मात्र दारू चढल्याने तो तेथेच खाली झोपला. याप्रकरणी रुग्णवाहिका चालक विजय भैयालाल बावगे यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा नोंदविला नव्हता.