डॉ. देवीसिंह शेखावत यांना मिळाला होता अमरावतीच्या पहिल्या महापौरपदाचा बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 11:18 AM2023-02-25T11:18:18+5:302023-02-25T11:19:00+5:30

आमदार म्हणून उमटवला होता ठसा, शैक्षणिक कार्यातही योगदान

Dr. Devisinh Shekhawat got the honor of being the first mayor of Amravati | डॉ. देवीसिंह शेखावत यांना मिळाला होता अमरावतीच्या पहिल्या महापौरपदाचा बहुमान

डॉ. देवीसिंह शेखावत यांना मिळाला होता अमरावतीच्या पहिल्या महापौरपदाचा बहुमान

googlenewsNext

अमरावती : देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे यजमान, अमरावतीचे पहिले महापौर तथा माजी आमदार डॉ.देवीसिंह शेखावत (९०) यांचे शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ६ वाजता पुणे येथील स्मशान घाटात अंत्यविधी पार पडला. यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, अमरावती शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत यासह अमरावती जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांची उपस्थिती होती.

डॉ.देवीसिंह शेखावत हे १९८५ ते १९९० या काळात अमरावती विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. अमरावती महापालिकेचे १९९२ मध्ये प्रथम महापौर म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली. अमरावती येथील विद्याभारती शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, अमरावती शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष १९९० ते १९९४ या दरम्यान धुरा सांभाळली. श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या सेलुबाजार येथील महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली. अमरावती येथे देशातील पहिले नवोदय विद्यालय, तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. डॉ.देवीसिंह शेखावत हे मूळचे राजस्थानचे असून, पुढे ते अमरावती येथे स्थानिक झालेत.

काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता हरपला : पटोले

देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती व ज्येष्ठ काँग्रेस नेते देवीसिंह शेखावत यांच्या निधनाचे वृत्त मनाला वेदना देणारे आहे. शेखावत यांनी शेवटपर्यंत काँग्रेस विचारधारेची साथ सोडली नाही. देवीसिंह शेखावत यांच्या निधनाने काँग्रेसने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे, अशी शोकभावना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

देवीसिंह शेखावत शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. शेखावत हे अमरावती महानगरपालिकेचे पहिले महापौर होते, तसेच १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत अमरावतीमधून निवडून आले होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सदस्यही होते. त्यांच्या निधनाने काँग्रेस विचाराचा एक सच्चा पाईक काळाच्या पडद्याआड गेला.

Web Title: Dr. Devisinh Shekhawat got the honor of being the first mayor of Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.