लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दशासर/अमरावती : गणेश विसर्जन साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना अव्हेरून पोलिसांनीच ठाण्याच्या आवारात डीजेच्या तालावर ‘झिंगाट’ डान्स केला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते १० पर्यंत झालेला पोलिसांचा ‘झिंगाट’ ठाणेदारांना मात्र महागात पडला आहे. सहायक पोलीस निरीक्षक असलेले ठाणेदार अजय आकरे यांना बुधवारी तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. त्यांचा प्रभार दुय्यम ठाणेदार संदीप बिरांजे यांच्याकडे देण्यात आला. चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्याकडे सदर प्रकरणाचा तपास देण्यात आला असून, त्यांना दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकस्तराहून दिले गेले आहेत. या प्रकरणी आठ पोलीस कर्मचारी रडारवर आले असून पोलीस ठाणे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार आहे. तत्पूर्वी, रविवारपासून लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक न काढता, ताशा-बँडचा गजर न करता शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी ठरवून दिलेल्या नियमांनुसार गणेश विसर्जन झाले. ठाण्याच्या आवारातील गणेशमूर्ती मंगळवारी रात्री विसर्जन करण्यात आले. बंदी घातलेल्या डीजेचा कर्कश्श आवाज तळेगाव ठाण्यात घुमला.शासन नियम धाब्यावर बसवत डीजेच्या तालावर पोलीस कर्मचारी नाचत असल्याचे दिसून आले.
एसडीपीओ तळेगावातपोलीस ठाण्यातील या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला. याबाबत नागरिकांकडून आक्षेप नोंदविताच उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव बुधवारी दुपारी १ वाजता तळेगाव दशासर पोलीस ठाण्याला भेट दिली.
नियम आमच्यासाठीच का?पोलीस ठाण्यात कर्णकर्कश डीजे वाजल्याबद्दल स्थानिक गणेश मंडळ व गावकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. नियम आमच्यासाठीच आहेत का, या पोलिसांवर कारवाई होणार का, अशी संतप्त प्रतिक्रिया गावातील नागरिकांकडून व्यक्त झाल्या होत्या.
तळेगाव दशासरच्या ठाणेदाराला नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. डीजेच्या तालावर नेमके कोण पोलीस कर्मचारी नृत्य करीत होते, ते चौकशीदरम्यान स्पष्ट होईल. चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी चौकशी करतील.- अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण