लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधील लिक्विड चार दिवसांपासून संपले आहे. यामुळे ऑक्सिजनवर निर्भर असलेल्या रुग्णांवर आता सिलिंडरच्या आधारे उपचार सुरू आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमितांची संख्या वाढतीच असल्याने उपलब्ध बेडची संख्या अपुरी पडण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच कोरोनाबाधितांवर अत्यंत महत्त्वपूर्ण उपचार ठरणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टँकमधील लिक्विड चार दिवसांपासून संपला असताना अद्याप संबंधित कंत्राटदाराने त्याची पूर्तता केलेली नाही. मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयात सारीच्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याने नियमित ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत आहे. वॉर्ड क्रमांक १० मध्ये सारी आजाराच्या रुग्णांवर उपचारार्थ १४ बेडची व्यवस्था असताना २५ रुग्णांवर उचार सुरू आहे. तेथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना सतत ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो. चार दिवसांपासून टँकमधील लिक्विड संपला असताना संबंधित एजन्सीला कळविल्यानंतरही पुरवठा झालेला नाही. त्यामुळे केवळ सिलिंडरच्या आधारे गरजूंना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
५५ वर्षीय व्यक्ती दगावलीमहात्मा फुले बँकेचे ५५ वर्षीय कर्मचारी चार महिन्यांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याचे निदान झाले. बरे झाल्यानंतरही त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवला. बुधवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना भरती करण्याची धडपड नातेवाईकांनी चालवली. परंतु ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊ शकले नाही. त्यातच गुरुवारी पहाटे प्राणज्योत मालवली.
एजन्सीचा हलगर्जीपणा जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन लिक्विड टँकद्वारा ३१ मार्चपासून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला गेला. ते लिक्विड संपल्यानंतर दोन वेळा लिक्विडचा भरणा करण्यात आला. तेसुद्धा संपले. यावरून ऑक्सिजनच्या मागणीचा अंदाज येतो. मात्र, आता सिलिंडर किती दिवस पुरणार, याचा विचार प्रशासनाने करायला नको का, असा सवाल उपस्थित होत आहे.
ऑक्सिजनची सर्वाधिक आवश्यकता सुपर स्पेशालिटीत असल्याने तेथे मुबलक ऑक्सिजन उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सारीच्या २५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यांच्याकरिता १४० सिलिंडर उपलब्ध आहेत. ते गरजेनुसार बोलावले जातील.- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक