धामणगाव रेल्वे : जिल्हा को़आॅपरेटिव्ह बँकेचे संचालक व येथील प्रतिष्ठित नागरिक सुरेश गजानन महल्ले यांनी गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान आजाराला कंटाळून रेल्वेखाली स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केली. मागील अनेक दिवसांपासून ते हदयविकाराने आजारी होते. दिघी महल्ले येथील मूळ रहिवासी सुरेश महल्ले अनेक वर्ष दिघी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा संचालक होते. तसेच जिल्हा बँकेचे संचालक होते़ दोन वर्षांपूर्वी त्यांची बायपास सर्जरी झाली होती़ गुरूवारी सकाळी अकरा वाजता धामणगाव रेल्वे फाटकानजीक अपलाईनवर पोल क्रमांक ७०८ नजीक त्यांनी मालगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केली़हदयविकाराला कंटाळल्याने जीवन संपवित असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे़ त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, भाऊ, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे़ गुरूवारी उशिरा रात्री त्यांच्या पार्थिवावर हिंदू स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आलेत. त्यांच्या निधनाबद्दल आ. वीरेंद्र जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत सहकारक्षेत्रातील गणमान्यांसह तालुक्यातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. सुरेश महल्ले यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिघी महल्ले येथील नागरिक देखील त्यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आजाराला कंटाळून जिल्हा बँकेच्या संचालकांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 00:08 IST