मोर्शी : वीज देयके थकीत असणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. त्यामुळे महावितरणला ग्राहकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे, ग्राहकांना भारी पडत आहे. अनेकांवर महावितरण अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून फौजदारी कारवाई होत आहे. शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी ते गुन्हे दाखल होत असल्याने वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना साधी विचारणासुद्धा करू नये काय, असा सवाल वीजग्राहक उपस्थित करीत आहेत.
विजेचा भरणा न केल्यास ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सध्या मोर्शी तालुक्यात जोरात सुरू आहे. मागील वर्षात ८ ते ९ महिने कडक लॉकडाऊन असल्याने शेतकरी, शेतमजूर, किरकोळ व्यापाऱ्यांना फार मोठे नुकसान सोसावे लागले. त्यात महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीजबिल भरण्याचा तगादा लावत आहेत. आम्ही एवढ्या दिवसाचे बिल कसे भरणार, असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेकडून केला जात आहे. महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारीसुद्धा शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करीत आहेत.
कोट
महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करणे हे भादंविचे कलम ३३२, ३३३, ३५३ नुसार गुन्हा आहे. सदर गुन्हा केल्यास १० वर्ष सश्रम कारावासाची तरतूद आहे. तरी कोणीही महावितरणच्या कार्यवाहीत अडथळा आणू नये. काही अडचणी असल्यास विद्युत वितरण कंपनीच्या मोर्शी येथील कार्यालयात तक्रार करावी.
- केशव ठाकरे,
ठाणेदार, शिरखेड पोलीस
कोट २
महावितरण कंपनीतर्फे राबविण्यात येत असलेल्या वसुली मोहिमेअंतर्गत थकबाकीदार वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. सर्व वीज ग्राहकांनी आपल्याकडील थकीत वीज बिलाचा भरणा ३१ मार्चच्या आत करून कंपनीला सहकार्य करावे.
- कल्पेश देवांग,
उपकार्यकरी अभियंता, मोर्शी उपविभाग