मोहन राऊत
धामनगाव रेल्वे : ना डॉक्टरची चिट्ठी, ना महत्त्वाचे कारण, मेडिकल घरानजीक असताना एक-दोन रुपयांच्या तापाच्या गोळीसाठी रिकामटेकडे संपूर्ण शहरात सैराटासारखे दुचाकीने फिरत असल्याने यावर वचक कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसभर घरात राहणारे कुटुंब रात्री रस्त्यावर शतपावली करीत फिरायला निघत असल्याने कोरोनाची साखळी तुटणार कशी, हादेखील प्रश्नच आहे.
जिल्हा प्रशासनाने १५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करीत सर्व शासकीय कार्यालयाची कामे बंद केली आहेत. बँकेतील पैसे काढण्याचा व्यवहारही बंद केला. प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. धामणगाव तालुक्याची कोरोना स्थिती पाहिली, तर आज जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचे कोरोना रुग्ण धामणगाव तालुक्यात आहेत. आठवड्यात एका दिवशी तब्बल ७० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण तालुक्यात आढळले आहे. प्रत्येक कोरोना चाचणीत दहा रुग्णांमागे चार रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळत आहेत. अनेक रिकामटेकडे सकाळी ७ वाजता कधी दुधाच्या नावाने, तर कधी दोन रुपयांच्या तापाच्या गोळीच्या नावावर अख्खे शहर पिंजून काढत आहे. पोलिसांनी अडवले असता, तापाची गोळी आणायला गेलो, विक्स, बाम खरेदीला गेलो, असे क्षुल्लक कारण सांगितले जाते. ज्या व्यक्तीच्या घराच्या बाजूला व रहिवासी असलेल्या चौक परिसरात मेडिकल आहेत, ते सोडून शहर फिरायची गरज काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
पोलिसांचा वचक, कारवाई आवश्यक
अकारण फिरणाऱ्यांवर चाप न लावल्यास सात दिवसांच्या लॉकडाऊनचा फायदा होणे शक्य नाही तसेच कोरोना साखळी तुटणार नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
दिवसा घरात रात्री कुटुंब रस्त्यावर
जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या या कडक निर्बंधाचे पालन काही कुटुंब करतात. मात्र, रात्रीला आपल्या लहानग्याला घेऊन रस्त्यावर फिरण्यासाठी येतात. दिवसा कोरोनाची भीती, तर रात्रीला कोरोनाचा फैलाव होत नाही का, असा प्रश्न निर्माण होतो. अंजनसिंगी, रामगाव, परसोडी, यवतमाळ या रस्त्यांवर फिरणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते.
यंत्रणा सजग, नागरिकांचे काय?
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे हे कोरोना चाचणीपासून, तर लसीकरण योग्य पद्धतीने व्हावे म्हणून स्वतः चिठ्ठ्या वाटतात. एका वर्षांपासून सतत अविरत सेवा देता-देता ते आजारी पडले आहे. तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांच्या नातेवाइकांचे निधन झाले तरी ते दुसऱ्या दिवशी रुजू होऊन तालुक्याच्या आरोग्य विभागाचा कारभार पाहत आहे. दत्तापूरचे पोलीस निरीक्षक ब्रमानंद शेळके हे २४ तास शहरात ड्युटी करीत आहेत. तहसीलदार गौरवकुमार भळगाठिया, गटविकास अधिकारी माया वानखडे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे हे कोरोनाविरुद्धच्या लढाईचे जोखमीने काम पार पाडत आहे.
कोट
वाढत्या कोरोनाकाळात सात दिवसही घरात न बसणाऱ्या व रस्त्यावर फिरणाऱ्या रिकामटेकड्यांना पकडून त्वरित त्यांची कोरोना चाचणी करा, त्यांचे वाहन जप्त करा तसेच न ऐकल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा, असे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
- इब्राहिम चौधरी, उपविभागीय अधिकारी, चांदूर रेल्वे