पालकमंत्र्यांचा पुढाकार : अटी, शर्थीच्या अधीन मिळणार परवानेअमरावती : शहरातील रहदारी, शांतता व सुव्यवस्था लक्षात घेऊन फेरीवाल्यांना महानगरपालिका, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रानंतर पोलीस विभागाकडून परवाने देण्याबाबत धोरण निश्चित करण्यात येईल, असे पालकमंत्री ना.प्रवीण पोटे यांनी सांगितले.शासकीय विश्रामगृहात सोमवारी ना.पोटे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील हॉकर्सला परवाने देण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे तसेच शहरातील फेरीवाले व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.ना.पोटे म्हणाले की, शहराची गरज लक्षात घेता फेरीवाले तसेच हातगाडीवर खाद्य पदार्थ विकणाऱ्यांसाठी परवाना आवश्यक आहे. फेरीवाले शहराच्या ज्या भागाचे रहिवासी आहेत, त्यांना त्याच भागात फुटपाथच्या खाली जागा निश्चित करुन देण्यात येईल. रहदारीच्या व गर्दीच्या ठिकाणी असे परवाने देण्यात येणार नाही. प्रत्येक फेरीवाल्याकडे कचराकुंडी आवश्यक राहणार आहे. रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने हे परवाने देण्यात येणार आहे. व्यवसाय म्हणून एकापेक्षा अधिक हातगाडीचे परवाने देण्यात येणार नाही. ज्या व्यक्तीच्या नावाने परवाने असेल त्यांनाच ती चालवता येईल. खाद्य पदार्थांच्या गाडीवर मद्यपी येणार नाही किंवा गोंधळ करणार नाहीत, याची दक्षता फेरीवाल्यांनी घ्यावी. बेशिस्त ग्राहक असतील तर त्यांच्यावर कार्यवाहीसाठी मनपाला कळवावे. शहर सर्वांचे असल्यामुळे सर्व फेरीवाल्यांनी शिस्तीमध्ये वागावे, असे ना. पोटे म्हणाले. (प्रतिनिधी)
हॉकर्सची समस्या निकाली
By admin | Updated: November 10, 2015 00:33 IST