वरूड : तालुक्यात शेकडो पतसंस्था, सहकारी संस्थाच्या वार्षिक आमसभेवर कोरोनाचे सावट असल्याने आभासी पद्धतीने अॅप्सवर त्या आमसभा घेण्याचे आदेश आहे. परंतु सर्वच सभासदांकडे अँड्रॉइड मोबाईल असेल असे नाही. ग्रामीण भागात नेटवर्कचा बोजवारा उडाल्याने लिंक मिळत नाही. यामुळे संस्थेचा लेखाजोखा कसा कळणार, हा प्रश्न आहे. नेटवर्कच्या अडचणी आणि मोबाईलव्या दुर्भिक्षामुळे सहकारी संस्थांच्या अॅपवरील आमसभा काही जणांपुरत्याच मर्यादित झाल्या आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पतसंस्था, सहकारी बँका व अन्य सहकारी संस्थांच्या वार्षिक आमसभा रद्द करून त्या आभासी पद्धतीने अॅपवर घ्याव्यात. अहवाल वाचन करून सभासदांना ती माहिती देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला. यात प्रचलित माध्यमाद्वारे व्यापक प्रसिद्धी देऊन सभासदापर्यंत माहिती पोहचविणे गरजेचे आहे. परंतु केवळ काही माध्यमांना माहिती प्रसिद्ध करून कागदोपत्री नोंद घेतली जाते. परंतु एखाद्या संस्थेचे सभासद नागपूर, वर्धा, अमरावती किंवा तालुक्याबाहेर वास्तव्यास असेल त्यांना माहिती मिळत नाही. अॅपवरील ऑनलाईन मिटिंगला अँड्राईड मोबाईल, इंटरनेट बॅलेन्स व नेट कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे ते नसले तर मिटिंग जॉईंट होत नाही. ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल असेल तेच या सभेला हजर राहू शकतील, एकाच कुटुंबातील चार-पाच सभासद असेल तर मोबाइल आणावे कुठून, हा प्रश्न आहे. संस्थेचा नफा-तोटा सभासदांना कळणार नाही. यावर संस्था निबंधकांचे दुर्लक्ष असल्याची ओरड सभासद करीत आहे.