११० रक्तजल नमुन्यांची तपासणी, ग्रामीण चार, शहरी भागातून एकाचा समावेश
अमरावती : जिल्हा हिवताप कार्यालयांतर्गत जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान तपासणीअंती पाच जणांना डेंग्यूचा डंख लागला आहे. यात ग्रामीण भागातील चार आणि शहरी भागातील एकाचा समावेश आहे. तसेच मलेरियाचा एक रुग्ण ग्रामीण भागात आढळला आहे.
जिल्ह्यात हिवताप अधिकारी कार्यालयांतर्गत विविध कर्मचाऱ्यांनी शहरी व ग्रामीण भागात डेंग्यू तपासणीकरिता जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यात ११० रक्तजल नमुने गोळा करण्यात आले. ते अकोला येथील सेंटिनल सेंटर (जीएमसी)त पाठविण्यात आले. त्यापैकी पाच डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात शहरी भागातील एक आणि ग्रामीण भागातील चार जणांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच जिल्ह्यात जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान मलेरिया संशयित भागातून ५५ हजार ८४ स्लाईड्स तपासणीकरिता पाठविण्यात आल्या होत्या. त्यात केवळ एकच रुग्ण मलेरियाग्रस्त आढळून आला असून, उपचाराअंती त्याची प्रकृती सुधारल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
-----
बॉक्स
डास उत्पत्तीला पोषक वातावरण
सलग चार दिवसांपासून ढगाळ वातारणासह पावसाने हजेरी लावल्याने पाण्याचे डबके साचले आहेत. तसेच घरासमोरील नाली बुजल्याने साठलेल्या पाण्यापासून अळ्यांची निर्मिती होऊन ते डासात रुपांतरित होतात. सध्याचे वातावरण याला पोषक असल्याने नागरिकांनी नाल्या वाहत्या कराव्या, शौचालयाच्या पाईपचे तोंड जाळीने झाकावे, टाक्या स्वच्छ करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी केले आहे.
कोट
जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात डेंग्यूचे ११० रक्तजल नमुने आणि ५५ हजार ८४ स्लाईड्स मलेरिया तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविल्या. त्यात पाच डेंग्यू आणि एक मलेरियाचा रुग्ण आढळून आला. उपचाराअंती ते बरेही झाले आहेत.
- शरद जोगी,
जिल्हा हिवताप अधिकारी