अमरावती : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळविणे विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. शैक्षणिक सत्र २०१५-१६ पासून ही अट लागू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यानुसार ८० गुणांसाठीच्या लेखी परीक्षेमध्ये किमान १६ वा त्यापेक्षा जास्त गुण मिळवू शकणारे विद्यार्थीच यापुढे संंबंधित विषयांमध्ये उत्तीर्ण होवू शकतील. दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी राज्य बोर्डाचे ८०-८० पॅटर्न लागून आहे. या पध्दतीनंतर दहावी आणि बारावीच्या निकालाने विक्रम गाठला आहे. निकालाच्या या टक्केवारीत वाढ गुणवत्तेमुळे नव्हे, तर एखादा विषय उत्तीर्ण होण्यासाठी लेखी आणि तोंडी परीक्षेमधील गुण एकत्र घेतल्याचे निष्कर्ष काढण्यात आला आहे. महाविद्यालय आणि शालेय स्तरावरील प्रात्याक्षिक किंवा तोंडी परीक्षेदरम्यान गुणांची खैरात वाटल्याने हा निकाल वाढल्याचे निकष काढण्यात येत होते. परीक्षेसाठी लेखी आणि तोंडी परीक्षेमध्ये विशिष्ट किमान गुणांची अट लागू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र त्याला मान्यताच न मिळाल्याने हा मुद्दा मागे पडला होता. तोंडी आणि लेखी परीक्षांसाठी ग्रेड सिस्टीम लागू करण्याची मागणी अनेक संस्थांकडून करण्यात येत होती. पुढील शैक्षणिक वर्षांपासून मात्र लेखी आणि तोंडी परीक्षेमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे होणार आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने यावर्षी ऐवजी पुढील शैक्षणिक सत्रापासून हा निर्णय अंमलात येणार आहे. त्यामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळवावेच लागतील.
प्रात्यक्षिक, लेखी परीक्षेत स्वतंत्र उत्तीर्ण व्हावे लागणार
By admin | Updated: October 21, 2014 22:44 IST