अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी रात्री ८ वाजता गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र, दीपाली यांच्या पार्थिवाला भडाग्नी देण्यापूर्वीच आरएफओ पदाचा कार्यभार दुसऱ्याला सोपविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी हा किती असंवेदनशील आणि क्रूर प्रवृत्तीचा आहे, हे स्पष्ट होते.
दीपाली आत्महत्याप्रकरणी गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचे निलंबन करण्यात आले. त्याचेविरुद्ध भादंविच्या ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ली तो न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र, दीपाली यांच्या मृत्यूला एम.एस. रेड्डी हासुद्धा जबाबदार असल्यामुळे राज्याच्या वनमंत्रालयाने रेड्डी याची २६ मार्च रोजी नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) यांच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत बदली करण्यात आली. परंतु, रेड्डी याने २६ मार्च रोजी दीपाली यांचा आरएफओ पदाचा कार्यभार विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे आरएफओ पी.एन. ठाकरे यांच्याकडे सोपविला. दीपाली यांच्या मृत्युनंतर अवघ्या १६ तासांतच दुसऱ्याकडे आरएफओ पदाचा कार्यभार सोपविण्याची घाई का, असा सवाल उपस्थित होत आहे. रेड्डी याने जेव्हा दीपाली यांचा कार्यभार दुसऱ्याला सोपविला तेव्हा त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदनदेखील झालेले नव्हते. त्यामुळे रेड्डी याने ठाकरे यांच्याकडे कार्यभार सोपविण्यामागे बरेच काही दडल्याचे बोलले जात आहे. हरिसाल आरएफओ पदाचा कार्यभार दुसऱ्याला सोपविण्यात रेड्डी याने एवढी घाई का केली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. दीपाली यांच्या आत्महत्येनंतर त्यांना न्याय मिळावा, यासाठी २६ मार्च रोजी सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, वनाधिकारी, वनकर्मचारी संघटना, बेलदार समाज एकवटला होता. मात्र, त्याच दिवशी एम.एस. रेड्डी याने अमानवी प्रवृत्तीचा कळस गाठला आणि त्याच्या बदलीच्या दिवशीही दीपाली यांचा आरएफओ पदाचा कार्यभार ठाकरे यांना सोपविला.
-------------------
कार्यभार सोपविण्यात घाई का?
हरिसाल वनपरिक्षेत्रातील जंगल, वन्यजीव हे काही दुसरीकडे पळून जाणार नव्हते. असे असताना एसीसीएफ रेड्डी याने दीपाली यांच्या आत्महत्येच्या दुसऱ्याच दिवशी कार्यभार सोपविण्याची घाई केली. यामुळे हरिसाल आरएफओमध्ये काहीतरी अपहार, भ्रष्टाचाराचे कुरण दडविण्यासाठी ठाकरे यांना समोर करण्यात आले नाही, अशी चर्चा रंगत आहे.