मोर्शी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करून बाजारपेठ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ठेवण्याची मागणी नगर परिषदेचे उपाध्यक्ष आप्पा गेडाम यांनी केली.
शेतकरी, शेतमजूर सकाळी ९ ला शेतीच्या कामाकरिता निघून जातात आणि दुपारी ४ वाजताच्या सुमारास परत येतात. बाजारपेठ त्या वेळेस बंद होऊन जाते. जीवनावश्यक किंवा दैनंदिन वस्तू खरेदीसाठी एक तर त्यांना शेतीच्या कामाला सोडून द्यावे लागते किंवा मजुरांना मजुरी पाडून बाजार करणे सध्या भाग पडत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ऊन झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. सकाळचा वेळ घराच्या कामात निघून जातो. दुसरीकडे नोकरदारांनासुद्धा ९ ते ४ चा वेळ सोईचा नाही. नोकर वर्ग बाहेरगावी जाताना सकाळी ९ वाजता निघून संध्याकाळी ६ वाजता परत येत असतो. त्यामुळे नोकरदारांनासुद्धा बाजारपेठ बंद अवस्थेत मिळते. या सर्व परिस्थितीचा सारासार विचार करता, जिल्हाधिकाऱ्यांनी बाजारपेठ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्याचे सुधारित आदेश पारित करून आम नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी गेडाम यांनी केली.
--------------