समाजसेवा : उच्चशिक्षित होऊन फेडले मातीचे ऋण संजय खासबागे वरुड महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवरील आदिवासी गाव वाई (खुर्द) येथे प्राथमिक शिक्षण घेऊन वैद्यकीय पदवी घेतलेले शाम सिरसाम यांनी जन्मभूमिशी नाळ कायम ठेवून वरूड येथील ग्रामीण रूग्णालयात स्त्रियांची तपासणी आणि नि:शुल्क शस्त्रक्रिया करीत आहेत. सेवेचे व्रत त्यांनी या काळातही जोपासले आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या सिरसाम यांनी पैशाचा हव्यास न करता सेवाव्रत पुढे सुरू ठेवले आहे. ते सध्या अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आहेत. परंतु जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी ते शासकीय सेवेतून वेळ काढून वरूड येथील ग्रामीण रूग्णालयात मोफत उपचार आणि प्रसंगी मोफत शस्त्रक्रिया करतात. सन २००५ पासून सातत्याने त्यांचे हे व्रत सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी तब्बल २९२ महिलांच्या मोफत शस्त्रक्रिया केल्यात. दोन वर्षे यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, ४ वर्षे डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात सेवा दिल्यांनतर आॅस्ट्रेलीया येथे पीएनजीमध्ये दोन वर्षे सेवा दिली. येथून परतल्यांनतर सावंगी मेघे येथे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुगणलयात साडेतीन वर्षे सेवा दिली. नांदेड येथे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय आणि आणि आता अकोला येथे वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी म्हणून ते कार्यरत आहे. परंतु जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. म्हणून सन २००५ पासून वरूड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार यांच्या सोबतीने परिसरातील गरजू महिलांना महागडे न परवडणारे आरोेग्य उपचार आणि शस्त्रक्रिया ते मोफत करू लागले. त्यासाठी ग्रामीण रुग्णालयात महिन्याकाठी शिबिर घेऊन लावून गर्भाशयाचे कॅन्सर, तसेच स्त्रीरोगावरील मोफत उपचार सुरु केले. सन २०१६ पर्यंत २९२ महिलावर लेप्रोस्कोपीसह गर्भाशयाची शस्त्रक्रिया, महागड्या शस्त्रक्रिया मोफत केल्यात.
दशकात २९२ मोफत शस्त्रक्रिया
By admin | Updated: December 25, 2016 00:17 IST