लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : चुरणी ग्रामीण रुग्णालयात चिमुकल्याचा शनिवारी पहाटे ५ वाजता जीव गेला. आरोग्य यंत्रणेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी आदिवासी दाम्पत्याने आमदार राजकुमार पटेल यांच्याकडे केल्यानंतर यंत्रणा हलली. आता तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत दोन दिवसांच्या या चिमुकल्याचे शवविच्छेदन करून सत्यता तपासली जाणार आहे. याप्रकरणात डॉक्टर व कर्मचाऱ्याच्या निलंबनासाठी आदिवासींनी ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत निलंबन होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने अकोला येथील आरोग्य उपसंचालकांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत परिचारिका वर्षा नवगिरे यांना निलंबित केले आहे. बुटीदा येथील अंजली अजय अखंडे यांना १८ ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी तिची प्रसूती झाली. बाळाचे वजन कमी असल्याचे अंजली यांच्या लक्षात आले. ही बाब हजर परिचारिका, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु, संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले. शनिवारी सकाळी बाळ दगावले.
कोणीच नाही ऐकले साहेब!शुक्रवारी रात्रभर कर्तव्यावर हजर परिचारिकांना बाळाच्या प्रकृतीसंदर्भात सांगितले. परंतु, त्यांनी सतत टाळाटाळ केली. डॉक्टरांनासुद्धा बोलावण्याचे कर्तव्य पार पाडले नाही, असा अनुभव अजय अखंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
चिमुकल्याचे शवविच्छेदन आमदार पटेल यांनी वरिष्ठांना दोषींवर कारवाईची मागणी करताच आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. आता या चिमुकल्याचे बालरोगतज्ज्ञ व वरिष्ठ डॉक्टरांच्या उपस्थितीत शवविच्छेदन होणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी साहेबलाल धुर्वे यांनी दिली.
बाळ कमी वजनाचे नव्हे, तर सुदृढ जन्माला आले. त्याचे वजन २ किलो ३०० ग्रॅम होते. बाळाचा श्वसननलिकेत दूध गेल्याने मृत्यू झाला. तज्ज्ञ डॉक्टरांकडून शवविच्छेदन केल्यावर सर्व बाबी स्पष्ट होईल. - साहेबलाल धुर्वे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, चुरणी
मेळघाटात आरोग्य यंत्रणेने मोठ्या प्रमाणात घोळ निर्माण केला आहे. आरोग्यमंत्र्यांना तशी तक्रार केली. चुरणी ग्रामीण रुग्णालयात जीव जाणे ही गंभीर बाब आहे. दोषींवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना सांगितले आहे.- राजकुमार पटेल, आमदार, मेळघाट