प्रदीर्घ काळानंतर होऊ शकतो ‘स्वाईन फ्लू’ बाधिताचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:04 AM2017-07-25T00:04:38+5:302017-07-25T00:04:38+5:30

तीन महिन्यांनंतर ‘स्वाईन फ्लू’बाधित रूग्णाचा रूग्णालयातच मृत्यू झाल्याची नोंद अमरावती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे.

The death of 'Swine Flu', which can happen after a long time | प्रदीर्घ काळानंतर होऊ शकतो ‘स्वाईन फ्लू’ बाधिताचा मृत्यू

प्रदीर्घ काळानंतर होऊ शकतो ‘स्वाईन फ्लू’ बाधिताचा मृत्यू

googlenewsNext

प्रतिबंधात्मक उपायच फायदेशीर : यंत्रणेसमोर उपचाराचे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तीन महिन्यांनंतर ‘स्वाईन फ्लू’बाधित रूग्णाचा रूग्णालयातच मृत्यू झाल्याची नोंद अमरावती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे. यावरून ‘स्वाईन फ्लू’ची उपचार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही थोडीशी हयगय झाल्यास हा आजार प्राणघातक ठरू शकतो. याबाबत पुरेशी जनजागृती करण्याची गरज आहे. वडाळी परिसरातील गगलानी नगरातील एका स्वाईन फ्लू बाधिताचा तब्बल तीन महिन्यांनी झालेला मृत्यू, याचे जिवंत उदाहरण ठरू शकतो.
स्थानिक वडाळी परिसरातील गगलानीनगरातील एका एएसआयचा स्वाईन फ्लूमुळे बळी गेला. सदर व्यक्ती ६ फेब्रुवारी २०१७ रोजी जबलपूर येथे आठवडाभरासाठी गेले होते. तेथून ते १६ फेब्रुवारीला त्यांच्या गगलानीनगरातील घरी परतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून त्यांना ताप, सर्दी, खोकला व घसा दुखण्याचा त्रास सुरू झाला. यानंतर यारूग्णाने १७ ते १९ फेब्रुवारीपर्यंत ‘पॅरासिटॅमॉल’ गोळ्या घेतल्या. मात्र, तरीही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने उपरोेक्त रूग्णाने २० फेब्रुवारी रोजी डॉ.चाफले यांना प्रकृती दाखविली. त्यांनीदेखील तपासणी करून एएसआयवर औषधोपचार केलेत. मात्र, यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
यानंतर एएसआय यांनी ८ मार्च रोेजी डॉ.समीर चौधरी यांच्याकडून उपचार घेतले. मात्र, यानंतरही त्या रूग्णाची प्रकृती खालावल्याने रूग्णाला १३ मार्च रोजी अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात पुढील उपचाराकरिता दाखल केले. येथील डॉक्टरांना एएसआयला ‘स्वाईन फ्लू’ची बाधा झाल्याची शंका येताच त्यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. ते पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या दिशेने उपचारही सुरू केलेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सुटी झाली. मात्र, पुन्हा महिनाभराच्या अंतराने त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यांना पुन्हा अकोल्याच्या सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी म्हणजे १३ एप्रिल २०१७ रोेजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपरोक्त रूग्णाला पूर्वीपासून डायबिटीज व हृदयरोगाचा त्रासही होता, हे येथे उल्लेखनिय. यावरून स्वाईन फ्लू उपचारानंतर पूर्णपणे बरा झाल्याचे दिसत असले तरी त्याचे दूरगामी परिणाम कालांतराने उफाळून येऊ शकतात, रूग्णांना या दिशेने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आरोग्य यंत्रणेने रूग्णांवर केवळ उपचार न करता प्रदीर्घ कालावधीसाठी आवश्यक उपाययोजनांचे मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

खासगी रुग्णालयात ‘स्वाईन फ्लू’बाधित रुग्ण
आरोग्य प्रशासनाने शहरात सद्यस्थितीत स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण नसल्याचा दावा केला असला तरी शहरातील एका खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूबाधित एक रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती "लोकमत"ला प्राप्त झाली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे.

एएसआयच्या मृत्यूची इत्थंभूत माहिती नाही
एसएसआयच्या पॉझिटिव्ह स्वॅबविषयी अमरावतीमधील आरोग्य यंत्रणेकडे फार तुरळक माहिती उपलब्ध आहे. इर्विन व महापालिकेकडून त्याच्या मृत्युसंदर्भात बारीक-सारिक माहिती गोळा करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अमरावतीमधील आरोग्य यंत्रणा किती संवेदनशील आहे, हे लक्षात येते.

बीपी, मधुमेह व ह्यदयरोगाच्या रुग्णांना जर स्वाईन फ्लूची लागण झाली असेल, तर अशा रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो. अशावेळी तो रुग्ण स्वाईन फ्लूनेच दगावला, असे म्हणता येणार नाही.
- पंकज दिवाण,
वैद्यकीय अधिकारी

Web Title: The death of 'Swine Flu', which can happen after a long time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.